गणेश उत्सव काळात अन्न व औषध प्रशासनामार्फत विशेष तपासणी मोहीम!

पिंपरी : गणेश उत्सव काळात नागरिकांना स्वच्छ निर्मळ अन्न प्राप्त व्हावे यासाठी अन्न व औषध प्रशासन पुणे मार्फत उत्सव काळात विशेष तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे. पुणे जिल्ह्यात 11 ऑगस्ट पासून आज पर्यंत एकूण 35 अन्न आस्थापनेच्या तपासण्या करण्यात आल्या असून अन्न आस्थापनेतून सणासुदीच्या काळात प्रसादासाठी लागणारे कच्चे अन्न पदार्थ व मिठाई यांचे एकूण 62 नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले आहेत .या तपासणीचा अहवाल प्राप्त होतात कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात येणार असल्याचे सहआयुक्त पुणे विभाग अन्न व औषध प्रशासन सुरेश अन्नपुरे यांनी सांगितले.

सणासुदीच्या काळात व्यापारी खाद्य पदार्थांमध्ये भेसळ मोठ्या प्रमाणात करतात. प्रामुख्याने गोड पदार्थांमध्ये खवा, पेढे , पनीर,दुध यामध्ये मोठ्या प्रमाणावर भेसळ होते .भेसळयुक्त अन्नपदार्थ खाल्ल्याने नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतो याची दखल घेऊन सणासुदीच्या काळात अन्न व प्रशासनाच्या वतीने अशी मोहीम राबवली जाते
सणासुदीच्या दरम्यान विक्री करण्यात येणाऱ्या अन्नपदार्थांमध्ये भेसळीबाबत काही संशय आल्यास जागरूक नागरिकांनी प्रशासनाचा 180022 23 65 या टोल फ्री क्रमांक वर संपर्क साधावा असे आवाहन सुरेश अन्नपुरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे