अल्लु अर्जुनच्या घरावर हल्ला; आरोपींना जामीन मंजूर

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
हैदराबाद : येथील ज्युबली हिल्स परिसरात असलेल्या तेलुगु सिनेस्टार अल्लू अर्जुनच्या घरावर काल काही जणांनी हल्ला केला होता. त्यानंतर यातील सहा आरोपींना अटक करण्यात आली होती. या आरोपींना हैदराबाद न्यायालयाने १० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर आज जामीन मंजूर केला आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, अभिनेता अल्लू अर्जुनच्या घरावर हल्ला करणाऱ्या सहा जणांना हैदराबाद न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. त्यांना आज सकाळी न्यायालयात हजर करण्यात आले होते. काल सायंकाळी हातात फलक घेत काही लोक अल्लू अर्जुनच्या घरात घुसले. यावेळी घोषणा देत हे लोक सुरक्षा भींतीवर चढत आणि टोमॅटो फेकू लागले. त्यानंतर सहा लोकांना अटक करण्यात आली होती, अशी माहिती हैदराबाद पश्चिम विभागाचे पोलीस उपायुक्तांनी दिली आहे.
या प्रकरणी बोलताना आरोपीचे वकील रामदास म्हणाले की, “ओस्मानिया विद्यापीठाचे विद्यार्थी शांततेत आंदोलन करत होते. तेव्हा पोलिसांनी बळाचा वापर केल्याने स्वसंरक्षणासाठी त्यांनी प्रतिकार केला. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. आज त्यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायमूर्तींनी कोणत्याही अटी आणि दंडाशिवाय जामीन मंजूर केला.”
चार डिसेंबर रोजी हैदराबादमधील एका चित्रपटगृहात पुष्पा २ चित्रपटाचा प्रीमियर आयोजित करण्यात आला होता. या प्रीमियरसाठी अल्लू अर्जुनही आला होता. त्याला बघण्यासाठी गर्दी जमल्यानंतर चेंगराचेंगरी झाली आणि यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला तर तिचा आठ वर्षांचा मुलगा जखमी झाला. यानंतर या प्रकरणाचे पडसाद अजूनही पाहायला मिळत आहेत. घडल्या प्रकारात आपला दोष नसून जो काही प्रकार घडला तो खेदजनक आहे, त्यासाठी मी माफीही मागतो असंही अल्लू अर्जुनने म्हटले होते.