बेस्ट बसच्या अपघातातील मृतांना पाच लाख

कुर्ल्यातल्या अपघातात मृतांचा आकडा सहा; ३६ जखमी, चालक अटकेत
फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
मुंबई, प्रतिनिधी : मुंबईत कुर्ला पश्चिम येथे सोमवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास बेस्ट बसने दिलेल्या धडकेत सहा जणांचा मृत्यू झाला तर ३६ जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी बस चालक संजय मोरे याला अटक करण्यात आली असून त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच लाखांची नुकसान भरपाई जाहीर केली आहे.
कुर्ला पश्चिम येथील महापालिकेच्या एल विभाग कार्यालयाजवळ सोमवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास ही बस कुर्ला पश्चिम येथून अंधेरीला जात होती. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि या बसने रस्त्यावरून जाणाऱ्या काही खासगी वाहनांसह रिक्षा तसेच अनेक पादचाऱ्यांना धडक दिली. त्यानंतर एक भिंतीवर ही बस आदळली. दरम्यान या सगळ्या प्रकारात ३० ते ३२ जण जखमी झाले. परिसरातील नागरिकांनी तातडीने जखमींना कुर्ला आणि महापालिकेच्या भाभा तसेच अन्य खासगी रुग्णालयात दाखल केले.
अफजल रसूल, आझम शेख, कानिफ कादरी, शिवम काशिम, या मृतांची ओळख पटली आहे. अपघातानंतर नागरिकांची मोठी गर्दी उसळली होती. पोलिसांनी रात्रीच चालक संजय मोरे याला ताब्यात घेतले. एकूणच तणावाचे वातावरण निर्माण झालेले पाहता, पोलिसांनी या परिसरात बंदोबस्त वाढवला आहे.