फक्त मुद्द्याचं!

21st February 2026
सांस्कृतिक

‘शिवगर्जना’ हे महानाट्य युवकांना सामाजिक बांधिलकीची प्रेरणा देणारे : मनोज जरांगे पाटील

‘शिवगर्जना’ हे महानाट्य युवकांना सामाजिक बांधिलकीची प्रेरणा देणारे : मनोज जरांगे पाटील

‘शिवगर्जना’ या भव्य महानाट्याचा दुसरा प्रयोग मोठ्या उत्साहात संपन्न…
पिंपरी ; ‘शिवगर्जना’ महानाट्याच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्य स्थापनेमागील उद्देश, लोकाभिमुख प्रशासन आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी केलेला संघर्ष प्रभावीपणे दाखविण्यात येत आहे. आजच्या काळात इतिहास केवळ लक्षात ठेवण्याचा विषय राहिलेला नाही, तर त्यातून प्रेरणा घेऊन सामाजिक बांधिलकी जपण्याची गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य उभे करताना न्याय, समता आणि कष्टकऱ्यांच्या हिताला केंद्रस्थानी ठेवले होते. हीच भूमिका आजच्या तरुणांनी स्वीकारली, तर समाजात सकारात्मक बदल घडू शकतो. युवकांमध्ये राष्ट्राभिमान जागवण्याबरोबरच समाजासाठी काहीतरी करण्याची जाणीव निर्माण करण्याची ताकद या महानाट्याच्या सादरीकरणात आहे, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी केले.

vcc 5
vcc 5

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ‘विचार प्रबोधन पर्वा’अंतर्गत सादर करण्यात आलेल्या ‘शिवगर्जना’ या भव्य महानाट्याचा दुसरा प्रयोग निगडी येथील नियोजित महापौर निवास परिसरात मोठ्या उत्साहात पार पडला. या महानाट्यास थोर सामाजिक कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित राहून संपूर्ण महानाट्य पाहिले, त्यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य ॲड.गोरक्ष लोखंडे, उपमहापौर शर्मिला बाबर, नगरसदस्य अमित गावडे, नगरसदस्य मारुती भापकर, अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, उप आयुक्त अण्णा बोदडे,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते ह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिवगर्जना महानाट्याद्वारे ऐतिहासिक घटनांवर आधारित प्रसंगांचे प्रभावी सादरीकरण, भव्य नेपथ्यरचना, पारंपरिक वेशभूषा आणि आधुनिक तांत्रिक साधनांच्या सहाय्याने उभारण्यात आलेल्या दृश्यांमुळे उपस्थित प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. सादरीकरणादरम्यान अनेक प्रसंगांना प्रेक्षकांनी उत्स्फूर्त दाद देत टाळ्यांचा कडकडाट केला.

या महानाट्यातून स्वराज्य स्थापनेचा संघर्ष, किल्ल्यांच्या लढाया, आरमार उभारणी तसेच शिवकालीन प्रशासनव्यवस्थेचे विविध पैलू नाट्यमय पद्धतीने उलगडण्यात आले. कलाकारांच्या जिवंत अभिनयातून साकारलेल्या प्रसंगांमुळे इतिहासाचा थरार अनुभवण्याची संधी उपस्थितांना मिळाली.

भव्य फटाक्यांच्या आतषबाजीमुळे उजळून निघाला भक्ती शक्ती चौक….
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त निगडी येथील भक्ती शक्ती समुहशिल्प उद्यान येथे भक्ती शक्ती शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने रात्री भव्य फटाक्यांच्या आतषबाजीचे आयोजन करण्यात आले होते. आकर्षक प्रकाशरेषा, रंगांची उधळण आणि विविध आकाशदीपांच्या सादरीकरणामुळे संपूर्ण परिसर उजळून निघाला होता. उपस्थित नागरिकांनी मोठ्या उत्साहात या आतषबाजीचा आनंद घेत जयंती सोहळ्याला जल्लोषमय वातावरणात साजरे केले. या नेत्रदीपक आतषबाजीमुळे परिसरात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"