आदिशक्तीच्या जागराला आरंभ

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : राज्यासह देशभरात सर्वत्र शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला आहे. घरोघरी घटस्थापना होऊन देवीची आराधना करण्यात आली आहे. सार्वजनिक मंडळांमध्ये देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून आता पुढचे नऊ दिवस हा उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा होणार आहे.
महाराष्ट्रात आदिमायाशक्तीची साडेतीन शक्तिपीठे आहेत. कोल्हापूरची महालक्ष्मी माता, तुळजापूरची भवानी माता, माहूरची रेणुका माता आणि वणी (नाशिक) येथील सप्तशृंगी माता यांना साडेतीन शक्तिपीठे म्हणून संबोधले जाते. या सगळ्या मंदिरांमध्ये देवीच्या आराधनेसाठी मंदिरे उत्तमोत्तम रितीने सजविण्यात आली आहेत. कालपासून सर्वत्र देवीचा जागर सुरू झाला आहे. उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत.
पिंपरी-चिंचवडमध्येही आदिशक्तीच्या विविध मंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. भल्या पहाटे दर्शनासाठी महिलांची रांग लागलेली आहे. दिवसभर भजन, भक्तीगीते असे विविध कार्यक्रम होत आहेत. महिलांचा यात लक्षणीय सहभाग आहे.
काय आहे शारदीय नवरात्राचा अर्थ?
शारदीय नवरात्रोत्सव हे देवी शारदेशी संबंधित आहे. प्रजापती दक्ष यांची कन्या गौरी अर्थात पार्वती तीच दुर्गा. ही अतिशय बुद्धिमान होती. अतिशय नाजूक आणि सुकुमार होती. अशी गौरी दुष्ट राक्षसांचा संहार करणारी तेजस्विनी कशी बनली. याचा एक सुंदर घटनात्मक क्रम पुराणात आहे. तेच या शारदीय नवरात्र उत्सवाचं महत्त्व आहे. महादेवांनीच तिला साक्षात जे ज्ञान दिले त्यामुळेच तिच्या हातून महिषासुरासारख्या महाभयंकर राक्षसाचा संहार केला गेला. हे काम तिच्या हातून घडलं त्यामुळे हा संहार करून झाल्यानंतर दसऱ्याचा दिवस होता, तेव्हा ती कैलासावर पुन्हा विराजमान झाली.
तिच्या या महान कार्याची दखल घेऊन तिची स्तुती करण्यासाठी सर्व देव त्यांच्या गणांसह कैलासावर एकवटले. या देवांना तिनं स्वतः सांगितलं की मी कशा प्रकारे बदलले, मी एवढी शक्तिमान कशी झाले, याचं कारण म्हणजे महादेवांनी दिलेली विद्या. विद्येची झाली सरस्वती शारदा. त्यामुळे शारदेचं महत्त्व दुर्गैनं सांगितलं तेव्हा जमलेल्या सर्व देवतांनी देवी शारदेचं कैलासावर पूजन केलं. म्हणून या नवरात्राला शारदीय नवरात्र असं म्हटलं जातं. हे शारदीय नवरात्र ज्या ऋतूमध्ये होते, तो शरद ऋतू. या प्रसंगामुळे ऋतुला शरद हे नाव पडलं आहे. दसऱ्यादिवशी आपण देवी शारदेची पूजा पाठ्यपुस्तकांची या रूपात करतो. मिळालेलं ज्ञान लोककल्याणासाठी वापरावं, असा उद्देश आहे.