बिहारच्या सिद्धेश्वर मंदिरात चेंगराचेंगरी

बिहार : श्रावण सोमवार असताना भगवान शंकरांच्या जलाभिषेकावेळी बिहारच्या जहानाबाद येथील सिद्धेश्वर मंदिरात आज सकाळी मोठी दुर्घटना घडली आहे. मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत सात भाविकांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये पाच महिलांचा समावेश आहे. या दुर्घटनेत १२ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यापैकी काही जण गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.
श्रावणातला सोमवार असल्यामुळे मंदिरात पहाटेपासूनच दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दर्शनासाठी थांबलेल्या भाविकांमध्ये सकाळी अचानक धक्काबुक्की झाली. यातच रेलिंग तुटल्यामुळे चेंगराचेंगरी झाली. चेंगराचेंगरी झाल्याचे पाहताच भक्तांनी धावपळ केली आणि ही दुर्घटना घडली. घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक घटनास्थळी रवाना झाले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. जखमी सध्या वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये दाखल आहेत. मृतांच्या आणि जखमींच्या कुटुंबीयांना भेटून त्यांना आवश्यक ती मदत केली जात असल्याचे जहानाबादचे एसएचओ दिवाकर कुमार विश्वकर्मा यांनी सांगितले. सध्या येथील परिस्थिती नियंत्रणात आहे.