सेवाकुंभ २०२५चे रविवार,१६ नोव्हेंबर रोजी आयोजन!

पिंपरी : विश्व हिंदू परिषद, पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या वतीने रविवार, दिनांक १६ नोव्हेंबर २०२५ रोजी रमणबाग शाळा, पुणे येथे सेवाकुंभ २०२५चे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय सहमंत्री तथा केंद्रीय सहसेवा प्रमुख स्वपनकुमार मुखर्जी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार असून प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ सिनेअभिनेते प्रवीण तरडे, विश्व हिंदू परिषद क्षेत्रमंत्री मा रामचंन्द रामुका, प्रा. अनंत पांडे, उद्योजक नितीन जाधव आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहील.

अखिल विश्वात हिंदूचे प्रतिनिधित्व करणारे विश्व हिंदू परिषद हे आंतरराष्ट्रीय संघटन आहे. स्थापनेपासून सेवा, सुरक्षा व संस्कार या त्रिसूत्रीवर आधारित परिषद कार्य करीत आहे. जनजातीय श्रेत्रातील विद्यार्थी आणि महिलांसाठी शिक्षण, स्वयंरोजगार, स्वावलंबन, आरोग्य व सर्वांगीण विकास सुलभ व्हावे म्हणून सेवा विभागामार्फत संपूर्ण देशभरात सुमारे ३५२६ ठिकाणी शिक्षण क्षेत्रात संस्कार शाळा, बालवाडी, अभ्यासिका, प्राथमिक शाळा, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा कार्यरत आहेत. आरोग्य क्षेत्रात सुमारे ११३७ ठिकाणी ग्रामीण आरोग्यरक्षक, चिकित्सालय, रुग्णवाहिका, ग्रामीण रुग्णालय, रक्तदान केंद्र चालविली जात आहेत. सामाजिक क्षेत्रात सुमारे ४४६ ठिकाणी किशोरी विकास प्रकल्प, मातृछाया अनाथ शिशुगृह, महिलाआश्रम, अंत्यसंस्कार केंद्र, वृद्धाश्रम कार्यरत असून स्वावलंबन या विषयावर सुमारे १२९० केंद्रांच्या माध्यमातून महिला आणि मुलींसाठी शिलाई केंद्र, सौंदर्य प्रसाधन आणि मेहंदी प्रशिक्षण, आरोग्य परिचारिका प्रशिक्षण, संगणक, गौ उत्पादने इत्यादी विषयांचे प्रशिक्षण दिले जाते.
अशाप्रकारे एकूण ६३९९ ठिकाणी जनजातीय क्षेत्रांत मुलामुलींसाठी आणि महिलांसाठी पश्चिम महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, कोल्हापूर, सोलापूर आणि अहिल्यानगर या विभागांतून एकूण ८२ प्रकारातील निरनिराळी सेवाकार्ये नियमितपणे सुरू आहेत. दर पाच वर्षांनी वेगवेगळ्या ठिकाणी सेवाकुंभाचे आयोजन केले जाते. प्रांतातील सर्व केंद्रातील, प्रकल्पातील आणि वसतिगृहातील जनजातीय मुलामुलींचे एकत्रीकरण, विविध कलांचे सादरीकरण, गुणांचे दर्शन, प्रकल्प परिचय आणि त्यांनी बनवलेल्या विविध वस्तूचे प्रदर्शन (स्टॅाल) असे या सेवाकुंभ २०२५चे स्वरूप असणार आहे. समरसता आणि एकतेचा संदेश देणाऱ्या सेवाकुंभ २०२५ या कार्यक्रमात पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील विद्यार्थी, महिला आणि नागरिक यांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन विश्व हिंदू परिषद, पिंपरी – चिंचवड कार्यालयातून पश्चिम महाराष्ट्र प्रांत मंत्री किशोर चव्हाण, प्रांत सहमंत्री ॲड. सतिश गोरडे, प्रांत सेवा प्रमुख ॲड. शाम घरोटे, मकरंद घैसास, संजय गोडबोले, राजेन्द शेवाळे, ज्ञानेश्वर इंगळे, शशिकांत घाटे यांनी केले आहे.

