फक्त मुद्द्याचं!

26th February 2026
सांस्कृतिक

ज्येष्ठ तमाशा कलावंत पद्मश्री रघुवीर तुकाराम खेडकर यांचा नागरी सन्मान!

ज्येष्ठ तमाशा कलावंत पद्मश्री रघुवीर तुकाराम खेडकर यांचा नागरी सन्मान!

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ; पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त २७ फेब्रुवारी रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. २७ फेब्रुवारी रोजी चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे महाराष्ट्राची लोककला असलेल्या तमाशा क्षेत्रात उल्लेखनीय योगदानाबद्दल भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेल्या ज्येष्ठ तमाशा कलावंत रघुवीर तुकाराम खेडकर यांच्या नागरी सन्मानासह मराठी भाषेचा जागर करणारे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन सकाळी १० वाजता महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.

viara vcc
viara vcc

२७ फेब्रुवारीला मराठी भाषेचा जागर
शुक्रवार, दि. २७ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे सकाळी १० वाजता उद्घाटन समारंभादरम्यान महाराष्ट्राची लोककला असलेल्या तमाशा क्षेत्रात उल्लेखनीय योगदानाबद्दल भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेल्या ज्येष्ठ तमाशा कलावंत रघुवीर तुकाराम खेडकर यांचा यावेळी नागरी सन्मान करण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी ११ वाजता ते “तमाशा – मराठी भाषा संवर्धन करणारी महाराष्ट्राची सांस्कृतिक लोकचळवळ” या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. दुपारी १२ वाजता लोकशाहीर विठ्ठल उमप थिएटर, मुंबई प्रस्तुत “माय मराठीची गौरवगाथा” हा महाराष्ट्राची मराठी भाषा आणि परंपरा विशद करणारा सांस्कृतिक महाकलाविष्कार सादर करण्यात येणार असून यात गायक संदेश विठ्ठल उमप, शाहीर पृथ्वीराज माळी व त्यांचे सहकारी सहभागी होणार आहेत.

दुपारी ३ वाजता स्थानिक निमंत्रित कवींच्या सहभागातून आयोजित कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी राज अहेरराव असतील. दुपारी ४ वाजता “अभिजात मराठी भाषेचे वैभव” या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला असून त्यात इंद्रायणी साहित्य परिषदेचे अरूण बोऱ्हाडे, पिंपरी चिंचवड शहर मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष प्रकाश निर्मल आणि मराठी साहित्याचे अभ्यासक डॉ. धनंजय भिसे हे मान्यवर सहभागी होणार आहेत. सायंकाळी ६ वाजता “आवाज लोकगीतांचा… गंध मराठी मातीचा…” या मराठी लोकगीतांच्या बहारदार कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायक विजय सरतापे, जगदीश गोरसे, विशाल ओव्हाळ, राणी म्हस्के आणि धीरज वानखेडे हे लोकगीत गायक आपली कला सादर करणार आहेत, अशी माहिती विशेष अधिकारी तथा मराठी भाषा समन्वय अधिकारी किरण गायकवाड यांनी दिली आहे. तसेच या कार्यक्रमांना नागरिकांनी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"