ज्येष्ठ अवकाश शास्त्रज्ञ डॉ.एकनाथ चिटणीस यांचे निधन!

मुंबई : भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या जडणघडणीत मोलाची भूमिका बजावणारे ज्येष्ठ अवकाश शास्त्रज्ञ डॉ. एकनाथ चिटणीस यांचे आज बुधवार 22 ऑक्टोबर रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. 26 जुलै 2025 रोजी त्यांनी आपला शतक महोत्सवी वाढदिवस साजरा केला होता . त्यांच्या कार्यासाठी त्यांना पद्मभूषण सह इतर अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे .

1950 मध्ये पुण्यातील इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये विक्रम साराभाई चे प्रेरणादायी भाषण ऐकून त्यांनी फिजिकल रिसर्च लॅबरोटरी मध्ये स्वयंसेवक म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला . त्यांनी कॉस्मिक किरणावरील संशोधनासाठी सेरेनकॉव्ह काउंटर तयार केला आणि पुढे एम आय टी मध्ये प्राध्यापक ब्रूनो रॅासी यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले .1961 मध्ये साराबाईंनी भारतात परत बोलावल्यावर चिटणीस यांनी देशातील पहिली सॅटॅलाइट टेलीमेट्री स्टेशन उभारले . तसेच तुंबा रॉकेट लॉन्चिंग स्टेशनची निवड करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली .
1963 मध्ये भारताच्या पहिल्या रॉकेटच्या उड्डानाचे त्यांचे स्वप्न साकार झाले .सॅटॅलाइट टीव्ही च्या माध्यमातून ज्ञानाचा प्रकाश देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यात प्राध्यापक एकनाथ वसंत चिटणीस यांचा सिंहाचा वाटा आहे . भारतीय अवकाश संशोधन संस्थेत डॉक्टर अब्दुल कलाम यांच्यावर कोणती जबाबदारी सोपवायची याचा निर्णयही चिटणीस यांनी घेतला होता. श्रीहरीकोटा येथील अग्निबाण प्रक्षेपण केंद्राची जागा त्यांनीच निश्चित केली होती.

