ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना ‘महाराष्ट्र भूषण’ जाहीर!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत विधानसभेत केली घोषणा
मुंबई : महाराष्ट्र भूषण 2024 पुरस्कार जाहीर करण्यात आला असून देशातील नामवंत शिल्पकार आणि महाराष्ट्र पुत्र राम सुतार यांना यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत विधानसभेत घोषणा केली. राज्य सरकारकडून ‘महाराष्ट्र भूषण’ हा पुरस्कार दरवर्षी देण्यात येतो. आजही ते शिल्प तयार करतात अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिली. विशेष म्हणजे गेल्याच महिन्यात राम सुतार यांचा 100 वा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे.
राम सुतार हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मुक्त शिल्पकार आहेत. यांचा जन्म इ.स.1925 मध्ये धुळे जिल्ह्यातील गोंदूर येथे झाला होता. देशभरात त्यांनी अनेक मोठी शिल्प तयार केली आहेत. त्यामध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या स्टॅच्यू ऑफ युनिटी या देशातील सर्वात उंच शिल्प पुतळ्याचे कामही त्यांनीच केले आहे. राम सुतार हे नामवंत वास्तुविशारद असून त्यांच्या कारकिर्दीच्या गेल्या चाळीस वर्षात पन्नासहून अधिक भव्य शिल्पे तयार केली आहेत. कला क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना 2016 मध्ये पद्मभूषण आणि 1999 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. राम सुतार यांनी जेजे स्कूल ऑफ ओरिएंटमधून आपले शिक्षण पूर्ण केले असून भारतीय पुरातत्व सर्वेक्षणासोबत त्यांनी वेरूळ गुंफांमध्ये काम केले.त्यांचा एकुलता एक मुलगा अनिल सुतार देखील एक शिल्पकार आहे आणि त्याने त्यांच्या वडिलांसोबत पुतळ्याच्या डिझाइनमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
महाराष्ट्र भूषण पुरस्काराने यांना यापूर्वी सन्मानीत करण्यात आले
पु लं देशपांडे ,गानसम्राज्ञी लता मंगेशकर , शास्त्रज्ञ विजय भटकर, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर , प्रसिद्ध गायक भीमसेन जोशी , समाजसेवक बाबा आमटे , शास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ रघुनाथ अनंत माशेलकर , प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा, ज्येष्ठ निरुपणकार दिवंगत नानासाहेब धर्माधिकारी , शास्त्रज्ञ आणि लेखक जयंत नारळीकर , शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे,प्रसिद्धा गयिका आशा भोसले , ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी , ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कारनं सन्मानित करण्यात आलं आहे.