ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे राहत्या घरी निधन!

पुणे : प्रख्यात खगोल शास्त्रज्ञ, लेखक आणि विज्ञान प्रसारक डॉ. जयंत विष्णू नारळीकर यांचे आज मंगळवारी पुण्यातील राहत्या घरी वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाले. पहाटे झोपेतच त्यांची प्राणज्योत मालवली .डॉक्टर जयंत नारळीकर यांच्या निधनाने सर्व स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे.
कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार डॉ. नारळीकर झोपेतच अनंतात विलीन झाले. त्यांना कोणताही दीर्घ आजार नव्हता .दोनच वर्षांपूर्वी त्यांच्या सुविध पत्नी आणि गणित तज्ञ मंगला नारळीकर यांचे निधन झाले आहे. डॉक्टर जयंत नारळीकर यांचा जन्म कोल्हापूर येथे 19 जुलै 1938 रोजी झाला. त्यांचे वडील विष्णू वासुदेव नारळीकर हे प्रसिद्ध गणित तज्ञ होते .वाराणसी येथील बनारस हिंदू विद्यापीठाच्या गणित शाखेचे ते प्रमुख होते. त्यांच्या मातोश्री सुमिती विष्णू नारळीकर या संस्कृत विदुषी होत्या . जयंत नारळीकर यांचे शालेय शिक्षण वाराणसी येथे झाले. बीएससी पदवी प्राप्त केल्यानंतर ते उच्च शिक्षणासाठी ब्रिटनमधील केंब्रिज विद्यापीठात गेले.

आयुका संस्थेची स्थापना
खगोलशास्त्रातील त्यांच्या संशोधनामुळे त्यांना जगभरात मान्यता मिळाली प्रसिद्ध ब्रिटिश खगोल शास्त्रज्ञ फ्रेड होईल यांच्यासोबत त्यांनी अनेक संशोधन प्रकल्पावर काम केले .पुण्यातील इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर एस्ट्रॉनॉमी अँड एस्ट्रो फिजिक्स आयुका या संस्थेची स्थापना त्यांनी 1988 मध्ये केली ,आणि त्याचे पहिले संचालक म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला .जयंत नारळीकर यांनी मराठी आणि इंग्रजी भाषेतून अनेक विज्ञान कथा ,लघु निबंध, पुस्तके अशी विपुल साहित्य संपदा लिहिली .नाशिक येथील 94 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पद त्यांना बहाल करण्यात आले. नारळीकर यांना त्यांच्या योगदानाबद्दल पद्मविभूषण ,पद्मभूषण या भारतीय नागरी सन्मानासह अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते .
देशाच्या ज्ञान-विज्ञानाच्या नभांगणातील तेजस्वी तारा निखळला: उपमुख्यमंत्री अजित पवार
“जागतिक किर्तीचे ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी ज्ञान-विज्ञानाच्या क्षेत्रात देशाला नव्या उंचीवर नेलं. विज्ञानाची सूत्रे, विज्ञानवादी विचार, वैज्ञानिक दृष्टीकोन नव्या पिढीमध्ये रुजवण्यासाठी जीवनभर कार्य केले. विज्ञानाची रहस्ये सहज-सोप्या भाषेत मुलांना समजावून सांगितली. त्यांच्या निधनाने ज्ञान-विज्ञानाच्या प्रसारासाठी वाहून घेतलेला देशाच्या वैज्ञानिक नभांगणातील तेजस्वी तारा निखळला आहे,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणाले की, “डॉ. जयंत नारळीकर जागतिक किर्तीचे वैज्ञानिक तसेच विज्ञानवादी विचार समाजात रुजवणारे कार्यशील विचारवंत होते. भौतिकविज्ञान, खगोलविज्ञानाच्या प्रसारासाठी त्यांनी स्थापन केलेली ‘आयुका’ संस्था ही देशाचं ज्ञानवैभव ठरली आहे.