शाळकरी विद्यार्थ्यांच्या चित्रांनी जिंकली मने!

महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी साकारलेल्या चित्रांचे ‘द आर्ट बॉक्स’प्रदर्शन उत्साहात
पिंपरी : विद्यार्थ्यांच्या नजरेतील विविध प्रकारचे चष्मे, भूमितीमधील वर्तूळ, चौकोन, त्रिकोण कल्पकतेने रेखाटत त्याद्वारे काढलेली विविध चित्रे, मुलांच्या कल्पनेतील उष्ण आणि शांत रंगाचे शहर, चित्रातून दाखवण्यात आलेले दयाळूपणाचे क्षण…यासह विविध विषयांवरील शाळकरी विद्यार्थ्यांनी रेखाटलेली चित्रे पाहण्याची संधी नागरिकांना मिळाली. निमित्त होते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या चित्रांचे भरवण्यात आलेले ‘द आर्ट बॉक्स’हे प्रदर्शन.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ३७ शाळांमधील विद्यार्थ्यांनी काढलेल्या चित्रांचे ‘द आर्ट बॉक्स’ हे चित्रकला प्रदर्शन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण प्राथमिक शाळा थेरगाव येथे आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते झाले. यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात, प्रशासन अधिकारी संगिता बांगर, मुख्याध्यापक श्रीकांत चौगुले यांच्यासह विविध शाळांचे शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.

चित्रकला प्रदर्शनामध्ये ‘आम्ही जलनिवासी-मासा’, ‘माझे विलक्षण विशेष चष्मे’, ‘रंग आव्हान’, ‘भिन्नांक कला’, ‘झेंटँगल्स’, ‘वस्त्रशिल्प-बाटीक’, ‘वर्तूळ आणि चौकन’, ‘टिट्स आणि शेड्स’, ‘ओरिगामी-पक्षी’, ‘इंद्रधनुष्य रंगांचे स्थानांतरण’, ‘शाळेच्या नावाची पाटी’, ‘हीदर गॅलरचे निसर्गचित्र’, ‘पॉल क्ले- उष्ण आणि शीत रंगाचे शहर’, ‘रेषांचा सराव’, ‘मेहंदी डिझाईन’, ‘स्थिरचित्र’, ‘वेगळेपण दाखवणे’, ‘दयाळुपणाचे क्षण’, ‘शहरी दृश्य’, ‘उष्ण-शीत रंगाच्या रेषांनी बनवलेली भूमीचित्रे’, ‘चुरगळलेल्या कागदपासून बनवलेली कला’, ‘प्रतिमा विस्तार’, ‘तुम्ही त्रिकोणापासून काय करू शकता?’ अशा विविध
विषयांवरील विद्यार्थ्यांनी काढलेली चित्रे होती. हे प्रदर्शन पाहण्यासाठी विविध शाळांतील विद्यार्थी, शिक्षक यांच्यासह परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती.
विद्यार्थ्याचीं दिसली कलात्मकता
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने यंदा प्रथमच कला अभ्यासक्रम सुरू केला आहे. हे प्रदर्शन म्हणजे या कला अभ्यासक्रमाचा एक प्रकारे उत्सव होता. या उपक्रमातून विद्यार्थ्यांची कलात्मकता आणि नवनिर्मिती दिसून आली. या चित्रकला प्रदर्शनासाठी नॉलेज पार्टनर म्हणून आकांशा फाऊंडेशन यांनी काम पाहिले.
‘द आर्ट ऑफ प्ले’ ने जिंकली मने
चित्रकला प्रदर्शनामध्ये सावित्रीबाई फुले इंग्लिश मिडियम स्कूल मोशी (आकांशा स्कूल) च्या विद्यार्थ्यांनी तयार केलेली ‘द आर्ट ऑफ प्ले’ ही कलाकृती मांडण्यात आली होती. या इंस्टॉलेशन आर्ट ने प्रदर्शनाला भेट णाऱ्यांची मने जिंकली. अनेकांनी या कलाकृतीचे कौतुक केले. तसेच मनपा शाळेतील माजी विद्यार्थिनी रुबी राम हिच्या पेटींगचे देखील प्रदर्शनात मांडण्यात आल्या होत्या. पेटिंग क्षेत्रात देखील करिअर करता येऊ शकते, हा संदेश या माध्यमातून देण्यात आला.
‘द आर्ट बॉक्स’ हे प्रदर्शन शाळकरी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला वाव देणारे ठरले आहे. विद्यार्थ्यांनी काढलेली चित्र पाहिल्यानंतर भविष्यात या विद्यार्थ्यांमधूनच आपल्या पिंपरी चिंचवड शहराचे नाव कला क्षेत्रात उज्ज्वल करणारे चित्रकार त्यांना योग्य मार्गदर्शन मिळाल्यास घडू शकतात, हे दिसून येते. त्यामुळेच महानगरपालिकेच्या शाळांमध्ये सुरू करण्यात आलेला कला अभ्यासक्रम येणाऱ्या काळात अधिक सक्षम करण्यावर भर दिला जाणार आहे. त्यासाठी कला शिक्षकांची संख्या ३२ वरून ६४ करण्यात येणार आहे. – शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महानगरपालिका