चोरट्यांकडून आता बनावट ई-मेलद्वारे फसवणुक!

पिंपरी-चिंचवड सायबर विभागाकडून सतर्कतेचे आवाहन
पिंपरी : सायबर गुन्हेगार दिवसेंदिवस नव्या युक्त्या शोधून नागरिकांची फसवणूक करत आहेत. चोरट्यांनी आता खासगी कंपन्यांमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावे बनावट ई-मेल, व्हॉट्स अप आणि स्काईप संदेश पाठवून कर्मचाऱ्यांची फसवणूक करण्याचा सपाटा लावला आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्याचे आवाहन पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी केले आहे.
अशाप्रकारे होत आहे फसवणूक
सायबर गुन्हेगार एखाद्या कंपनीतील उच्चपदस्थ अधिकारी किंवा व्यवस्थापकाचे नाव वापरून कर्मचाऱ्यांना बनावट ई-मेल, व्हॉट्स अॅप किंवा स्काईप संदेश पाठवतात. यामध्ये कंपनीतील एखाद्या कर्मचाऱ्याचा किंवा त्याच्या लग्नवाढदिवसाचा उल्लेख केला जातो. त्यानिमित्ताने गिफ्ट खरेदी करण्याची सूचना दिली जाते. कर्मचाऱ्याला मेल किंवा मेसेजवर आलेला कोड विचारला जातो. एकदा हा गिफ्ट कार्ड कोड मिळाल्यानंतर सायबर गुन्हेगार त्याचा उपयोग करून मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक करतात. अनेक प्रकरणांमध्ये कर्मचारी किंवा कंपनीला याचा उशिरा उलगडा होतो, तोपर्यंत मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले असते.
सायबर पोलिसांचा इशारा
कर्मचाऱ्यांनी कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाने आलेले ई-मेल, व्हॉट्स अप किंवा स्काईप संदेश तपासणे आवश्यक आहे. बनावट संदेशांतील ई-मेल डोमेन आणि अधिकृत डोमेन यातील फरक लक्षात घेणे गरजेचे आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अशी मागणी केली आहे का, याची खात्री करण्यासाठी त्यांच्याशी थेट संपर्क साधा. कोणत्याही लिंकवर क्लिक करण्यापूर्वी किंवा गिफ्ट खरेदी करण्यापूर्वी त्याची शहानिशा करा. अशा प्रकारच्या फसवणुकीचा प्रयत्न होत असल्यास त्वरित सायबर पोलिसांना कळवा.
इथे तक्रार करा
सायबर क्राइम हेल्पलाइन १९३०, ऑनलाइन तक्रारीसाठी : www.cybercrime.gov.in पिंपरी-चिंचवड सायबर पोलिस ठाणे ई-मेल: cybercell.pcpc-mhmaha-police.gov.in
कोणत्याही कंपनीचा वरिष्ठ अधिकारी अशाप्रकारे ई-मेल किंवा मेसेजद्वारे गिफ्ट खरेदी करण्यास सांगत नाही. त्यामुळे अशा कोणत्याही संदेशावर विश्वास ठेवू नका आणि योग्य ती पडताळणी करूनच पुढील कार्यवाही करा.– संदीप डोईफोडे, पोलिस उपायुक्त (गुन्हे), पिंपरी-चिंचवड.