संतांचे वाड्मय सोप्या भाषेत मांडायला हवे

मातृमंदिर विश्वस्त संस्थेच्या संत साहित्य पुरस्कार वितरणात सुभाषराव देशपांडे यांचे प्रतिपादन
फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : माध्यम कोणतेही असो विचार महत्त्वाचे आहेत. आपण ऑनलाईन जास्त माहिती मिळवतो. केंद्र सरकारने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा नुकताच दिला आहे. आजवर संतांनी केलेले कार्य अमूल्य आहे. त्या-त्या पिढीतील संतांचे वाड्मय येणाऱ्या पिढीपुढे सोप्या – सुगम भाषेत मांडले पाहिजे. संत साहित्याला अजूनही मागणी आहे, असे मत ज्ञानप्रबोधिनी संस्थेचे विश्वस्थ सुभाषराव देशपांडे यांनी व्यक्त केले.
निगडी येथील मनोहर सभागृहात मातृमंदिर विश्वस्त संस्थेच्या वतीने संत साहित्य पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मातृमंदिर विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष नितीन करीआ, उपाध्यक्ष शारदा चोरडिया, उपाध्यक्ष यशवंत लिमये, कार्यवाह मनोजराव देवळेकर, सहकार्यवाह सुधीर कुलकर्णी आदी उपस्थित होते.
शारदाताई चोरडिया म्हणाल्या, ‘तुमच्याकडे दोन रुपये असतील, तर एक रुपयांची चपाती घ्यावी आणि दुसऱ्या रुपयांचे संत साहित्य घ्यावे, जे तुम्हाला कसे जगावे ते शिकवते. वाचन ते आचरण असा आपला प्रवास झाला पाहिजे.’
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे :
चिंतनपर, विवेचनपर पुस्तके गट १ : लेखक संध्या कोल्हटकर (पुणे) गीतांजली प्रकाशनाच्या दासबोध सार-सर्वस्व श्रवण ते साक्षात्कार, प्रथम व मीनाक्षी देशमुख (अकोला) सत्या प्रकाशनाच्या संत कथासरिता ग्रंथाला द्वितीय क्रमांक दिला आहे. तृतीय क्रमांक हा विभागून दिला. रवींद्र बेम्बरे, (देगलूर) स्नेहवर्धन प्रकाशनाच्या ज्ञानयोगी संत श्री धुंडा महाराज देगलूरकर ग्रंथ व डॉ. नामदेव सोडगीर, (लातूर) छाया प्रकाशनाच्या संताची विराणी : आकलन आणि चिंतन या ग्रंथांचा समावेश आहे.
गट २ : संत जीवन- ललित साहित्यात मंजूश्री गोखले (कोल्हापूर) मेहता प्रकाशनाच्या समर्थ ग्रंथाला दिला आहे. विशेष पुरस्कार : लेखक श्यामा देशपांडे, संपादक चातक देशपांडे (पुणे) यांच्या श्री ज्ञानेश्वरी व अमृतानुभवातील काही प्रतिमा एक चिंतन व डॉ. संतोष देठे (चंद्रपूर) मेहेरबाबा प्रकाशनाच्या क्रांतिदर्शी तुकाराम, लक्ष्मण घुगे (पुणे) मुक्ता आर्ट्स प्रकाशनाच्या पावन पवित्र सार्थ श्री ज्ञानेश्वरी ग्रंथाला प्रदान केला.