भारताचे ५१ वे सरन्यायाधीश म्हणून संजीव खन्ना यांची निवड

नवी दिल्ली : भारताचे ५१ वे सरन्यायाधीश म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सजीव खन्ना यांची निवड करण्यात आली आहे. केंद्रीय विधी व न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी ही घोषणा थोड्यावेळापूर्वी केली. मावळते सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी मागच्या आठवड्यातच संजीव खन्ना यांचे नाव सुचविले होते. त्यानंतर आता राष्ट्रपतींनी खन्ना यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले असून ११ नोव्हेंबर रोजी ते सरन्यायाधीश पदाची शपथ घेतील. चंद्रचूड यांच्यानंतर संजीव खन्ना हे सर्वात वरिष्ठ न्यायाधीश आहेत. त्यांच्या काळात त्यांनी काही ऐतिहासिक आणि महत्त्वाचे निकाल घेतले आहेत.
मावळते सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी मागच्या आठवड्यातच संजीव खन्ना यांचे नाव सुचविले होते. त्यानंतर आता राष्ट्रपतींनी खन्ना यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले असून ११ नोव्हेंबर रोजी ते सरन्यायाधीश पदाची शपथ घेतील. याच दिवशी विद्यमान सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांचा कालावधी संपत आहे.
संजीव खन्ना यांचा जन्म १४ मे १९६० रोजी झाला असून सुमारे चार दशकाहून अधिक काळ ते न्यायिक क्षेत्रात काम करत आहेत. १९८३ साली दिल्ली बार कौन्सिलचे सदस्य झाल्यानंतर त्यांनी जिल्हा न्यायालय तीस हजारी कोर्ट नंतर दिल्ली उच्च न्यायालय आणि विविध लवादांमध्ये वकिली केली. घटनात्मक कायदा, कर आकारणी, विविध लवाद, व्यावसायिक कायदे, कंपनी कायदे आणि पर्यावरण कायदे यासारख्या कायद्याच्या अनेक क्षेत्रात त्यांनी यशस्वीरित्या वकिली केली.
न्यायमूर्ती खन्ना यांनी प्राप्तिकर विभागासाठी वरिष्ठ वकील म्हणून काम केले आणि २००४ मध्ये दिल्लीच्या एनसीटी (सिव्हिल) विभागासाठीही वकिली केली. दिल्ली उच्च न्यायालयात काही गुन्हेगारी प्रकरणांमध्ये त्यांनी अतिरिक्त सरकारी वकील म्हणूनही भूमिका बजावली.
२००५ साली त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून काम करण्यास सुरुवात केल्यानंतर ते २००६ साली न्यायमूर्ती म्हणून कायम झाले. १८ जानेवारी २०१९ रोजी त्यांची सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून निवड झाली. न्या. संजीव खन्ना हे सध्या राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम करत आहेत. तसेच राष्ट्रीय न्यायिक अकादमी, भोपाळच्या गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य आहेत. जून ते डिसेंबर २०२३ या काळात त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या विधी सेवा समितीचे अध्यक्षपदही भूषविले होते