संजय काका पाटीलांनी बांधलं घड्याळ

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
मुंबई, प्रतिनिधी : राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुकांची धडपड सुरू आहे. अनेकांचे पक्षांतर सुरू आहे तर पक्षातून तिकीट न मिळाल्यास काहींनी अपक्ष लढण्याची तयारी देखील ठेवली आहे. सांगलीचे माजी खासदार संजय काका पाटील यांनी सुद्धा आता भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षात प्रवेश केला आहे.
माजी खासदार संजय काका पाटील हे तासगाव -कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडून तासगाव -कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर.आर.पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे. त्यामुळे आता या मतदारसंघात माजी खासदार संजय काका पाटील आणि रोहित पाटील यांच्यात लढत होणार आहे.
विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर विविध राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून संजय काका पाटील हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. अखेर या चर्चांवर आता पडदा पडला आहे. त्यामुळे आता तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाच्या विधानसभेच्या लढतीकडे अनेकांचे लक्ष लागलेले आहे.