औद्योगिक क्रीडा स्पर्धेचे यजमानपद सँडविक एशिया कंपनीकडे!

स्पर्धांचा शुभारंभ ऑगस्ट महिन्यात
चाकण :,औद्योगिक क्रीडा संघटनेच्या बैठकीचे नियोजन टेट्रा पॅक ,चाकण येथे करण्यात आले.या वेळी २०२५-२६ वर्षाचे क्रीडा स्पर्धेचे ( ६२ वे वर्ष ) वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले. यावर्षीच्या स्पर्धांचा शुभारंभ ऑगस्ट महिन्यात पोहण्याच्या स्पर्धेने सुरुवात होईल. या स्पर्धेचे आयोजन सँडविक एशिया कंपनीकडून होईल.

या बैठकीच्या वेळी टेट्रापॅक कंपनीचे संतोष सोनटक्के,महेश खर्डेकर,विशाल देशमुख ,औद्योगिक क्रीडा संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र नागेशकर,उपाध्यक्ष नरेंद्र कदम,सचिव वसंत ठोंबरे,खजिनदार प्रदीप वाघ, स्पर्धा प्रमुख हरी देशपांडे,विजय हिंगे ,बालाजी नानिवडेकर यांच्या सह अतुल काळोखे ( बजाज ऑटो)सुयोग फुलबडवे (सिग्मा इलेक्ट्रिकल्स),धीरज अधिकारी(अल्ट्रा कॉर्पोटेक),अमित कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. औद्योगिक क्रीडा संघटनेचे राजेंद्र नागेशकर यांनी सर्व स्पर्धा मधून महिलांचा सहभाग वाढविण्याचे आवाहन केले. चाकण परिसरातील कंपन्यांच्या कामगारांचा सहभाग यावेळी अधिकाधिक वाढावा या दृष्टीने प्रयत्न करण्याचे सुचविले.
या वेळी बोलताना संतोष सोनटक्के म्हणाले खेळ हा कामगारांच्या मानसिक व शारीरिक आरोग्य संतुलित राखतो.आत्ताच्या तणावाच्या व स्पर्धेच्या काळात त्याची गरज आहे.औद्योगिक क्रीडा संघटनेच्या स्पर्धांमधून माझ्या कंपनीतील कामगारांचा जास्तीत जास्त सहभाग कसा असावा याकडे आमचे लक्ष असेल.औद्योगिक क्रीडा संघटना त्यासाठी उत्तम कार्य करीत आहे.या बैठकीसाठी विजय हिंगे,नरेंद्र कदम व हरी देशपांडे यांनी पुढाकार घेतला. बैठकीच्या निमित्ताने सचिव वसंत ठोंबरे यांनी आभार मानले तर खजिनदार प्रदीप वाघ यांनी सर्व खेळांचे वेळापत्रक जाहीर केले व त्याचे आयोजन ,नियोजन व स्पर्धा पद्धती याबद्दल माहिती दिली.या वेळी विविध खेळांच्या स्पर्धाबरोबर बास्केटबॉल, बिलियर्ड,मैदानी स्पर्धा घेण्याचे विविध कंपन्यांच्या मागणीवरून ठरविण्यात आले.मागील वर्षी एकूण २०० पेक्षा जास्त कंपनीच्या २३०० पेक्षा जास्त खेळाडूंनी औद्योगिक क्रीडा संघटनेच्या स्पर्धांमधून भाग घेतला.