शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पोटी 2215 कोटी रुपयांची मदत : मुख्यमंत्री फडणवीस

राज्यात सरासरीच्या 102 टक्के पाऊस
मुंबई : राज्यात मुसळधार पाऊस पडत असून सरासरीपेक्षा एकशे दोन टक्के अधिक झाल्याने राज्यात अतिवृष्टी सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात आतापर्यंत 975.5 मिलिमीटर पाऊस पडला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची तातडीने मदत दिली जाईल. संपूर्ण भागाचे पंचनामे होईपर्यंत सरकार वाट पाहणार नाही. आजपर्यंत 31 लाख 64 हजार शेतकऱ्यांना 2215 कोटी रुपयांची मदत करण्याचे जीआर काढण्यात आले आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर दिली.

त्यापैकी 1 829 कोटी रुपये संबंधीत जिल्ह्यांमध्ये पोहोचले आहेत . मराठवाड्यातील पूरपरिस्थितीची गंभीर दखल घेण्यात आली आहे. काही भागात पूर परिस्थितीमुळे लोक अडकले आहेत. बीड, धाराशिव या परिसरात रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहेत. याशिवाय बचाव कार्य देखील सुरू आहे. धाराशिव जिल्ह्यात 27 जणांना हेलिकॉप्टरने बाहेर काढण्यात आले असे त्यांनी सांगितले. अहिल्यानगर ,बीड ,परभणी, जळगाव आणि सोलापूर या भागामध्ये अतिवृष्टी झाली आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेश यापूर्वीच दिले आहेत. सगळे पंचनामे झाल्यावर एकत्रित मदत करणे ऐवजी जसे पंचनामे होतील तशी तातडीने मदत करण्याचे धोरण राज्य सरकारने सुरू केले आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्व जिल्ह्यांमधील पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. उद्यापासून सर्व पालकमंत्री पूरग्रस्त भागांना भेटी देतील मी स्वतः काही भागांमध्ये जाणार आहे असे त्यांनी स्पष्ट केले.
राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे . शेतकरी देखील याबाबत आग्रही आहेत. या संदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांना प्रसिद्धी माध्यमांनी विचारले असता त्यांनी त्यावर स्पष्टपणे बोलणे टाळले . ज्या ठिकाणी नुकसान झाले आहे तेवढ्या पद्धतीची मदत आपल्या नियमांमध्ये आहे, तेवढी आम्ही शेतकऱ्यांना देऊ असे त्यांनी स्पष्ट केले. केंद्र सरकारकडून मदत येण्यासाठी वेळ लागेल कारण सगळे मूल्यमापन करून एकच प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवला जातो . नंतर मदत येते मात्र केंद्र सरकारने आपल्याला एनडीआरएफ अंतर्गत अगोदरच पैसे दिलेले असतात , ते पैसे आपण खर्च करतो. केंद्र सरकार निश्चित मदत करेल पण तोपर्यंत राज्य सरकार थांबणार नाही .आम्ही शक्य ती तातडीची मदत शेतकऱ्यांना करूअसे फडणवीस यांनी सांगितले .राज्यात सरासरीच्या 102 टक्के पाऊस शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पोटी 2215 कोटी रुपयांची मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

