कौटुंबिक सोहळ्यात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र, संवादही झाला!

मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसेप्रमुख राज ठाकरे मुंबईत एकत्र आल्याचं पाहायला मिळाले. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या भाच्याचं आज लग्न होतं. या लग्न सोहळ्यानिमित्त राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंसह संपूर्ण कुटुंब एकत्र पाहायला मिळाले. यावेळी आदित्य ठाकरे, अमित ठाकरे, रश्मी ठाकरे देखील उपस्थित होते.
दादर येथील विवाह सोहळ्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले. या कौटुंबिक सोहळ्यात दोन्ही नेत्यांनी संवाद ही साधला. यावेळी खेळीमेळीचे वातावरण दिसले. दोन्ही भावात काही वेळ एकमेकांशी संवाद साधल्याचे दिसले. यापूर्वीच्या सोहळ्यात आणि कार्यक्रमात दोन्ही बंधू एकत्र दिसले होते. पाच दिवसांपूर्वी सुद्धा रश्मी ठाकरे यांचा भाचा आणि श्रीधर पाटणकर यांच्या मुलाच्या लग्न सोहळ्यात राज ठाकरे हे उपस्थित होते. त्यावेळी रश्मी ठाकरे यांनी त्यांचे स्वागत केले होते. पण दोन्ही बंधुची भेट थोडक्यात हुकली होती. पण या लग्न सोहळ्यात दोन्ही बंधु एकत्र आल्याचे दिसून आले.
मागील दशकभरापासून राज आणि उद्धव या ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे. २०१४ च्या निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्रित निवडणूक लढवणार असल्याचेही समोर आले होते. मात्र, ऐनवेळी काही गोष्टी न जुळल्याने दोन्ही बंधू एकत्रित आले नाहीत. त्यानंतर आता, विधानसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट आणि मनसेला पराभवाचा जबर धक्का बसला. मराठी माणूस हा अजेंड्यावर असलेल्या पक्षांचा दारूण पराभव झाल्याने शिवसेना-मनसेने एकत्रित यावे, अशी मागणी पुन्हा सुरू झाली आहे.