पुण्यातील मानाच्या गणपतींचे मंडळाच्या शिस्तीमुळे वेळेआधी विसर्जन!

पुणे :अनंत चतुर्थीच्या दिवशी पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीला पारंपारिक पध्दीने महात्मा फुले मंडईतील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यापासून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या हस्ते सुरुवात झाली .यावेळी मानाच्या कसबा गणपती मंडळाच्या पालखी मधून गणेशाची मिरवणूक काढण्यात आली. राज्याचे तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ , राज्यमंत्री माधुरी मिसाळ आणि मंडळाचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.


मानाच्या पाच गणपतीची मिरवणूक यावर्षी नेहमीपेक्षा लवकर सुरू करण्यात आली .विसर्जन मिरवणुकीला उशीर होत असल्याने शिस्तबद्ध रीतीने ढोल ताशांच्या गजरात लाडक्या गणपती बाप्पांना निरोप देण्यासाठी गणेश भक्तांनी लक्ष्मी रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी केली होती. यंदा डीजे बंद असल्याने पारंपारिक ढोल ताशा च्या तालावर मिरवणुकीचे वातावरण दुमदुमले होते. पुण्यातील मानाचा पहिला कसबा आणि दुसरा तांबडी जोगेश्वरी गणेश मंडळाची विसर्जन मिरवणूक ठरलेल्या वेळेआधी अलका चौकात पोहोचल्याबद्दल पोलीस आणि प्रशासनाकडून त्यांचे अभिनंदन करण्यात आले .अलका चौकातून पावणेतीन वाजता मानाचा पहिला कसबा गणपती विसर्जनासाठी विसर्जनासाठी मार्गस्थ झाला. त्या पाठोपाठ मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी मंडळ मार्गस्थ झाले .
मानाचा तिसरा गणपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुरुजी तालीम गणपती मंडळाची विसर्जन मिरवणुक दाखल झाली. गुरुजी तालीम मंडळाच्या गणपतीला पाहण्यासाठी विसर्जन मार्गावर प्रचंड गर्दी झाली होती .भक्तांचा गणपती बाप्पा मोरया चा अखंड जयघोष यावेळी सुरू होता.. संपूर्ण वातावरण भक्तीमय झाले होते.
पुण्यातील मानाचा चौथा गणपती तुळशीबाग गणपती विसर्जन मिरवणुकीत वाद्याच्या गजर आणि ढोल ताशांच्या जल्लोषात अलका टॉकीज चौकात दाखल झाला .तुळशीबाग मंडळाचा गणपती दरवर्षी आपल्या देखण्या सजावटीसाठी आणि शिस्तबद्ध मिरवणुकीसाठी ओळखला जातो .आजच्या मिरवणुकीत महिला, तरुण आणि लहान मुलांनी उत्साहात सहभाग घेतला. मानाचा पाचवा गणपती श्री केसरी वाडा गणपती अलको टॅाकीज चौकात वाजत-गाजत पोहोचला. ढोल ताशांच्या गजरात बाप्पांचे स्वागत होत होते.
पुण्यातील श्रध्येचे केंद्रबिंदू असलेले श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती आज विसर्जन मिरवणुकीत साडेचार वाजता बेलबाग चौकात दाखल झाला. श्रीमहागणनायक भव्यरथ ओढण्यासाठी यंदा तब्बल सात बैल जोड्या जुंपल्या असून रथाचे वैभव आणि पारंपारिक सजावट पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. ढोल ताशांच्या निनादात आणि फुलांच्या वर्षावात दगडूशेठ गणपतीचा रथ विसर्जन मिरवणुकीतून पुढे सरकत होता. पुणेकरांनी गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात रथाचे स्वागत केले.
यंदा मानाच्या गणपतींची विसर्जन मिरवणुक लवकर सुरु झाल्याने आणि मडळाच्या कार्यकर्त्यांनी शिस्तीचे दर्शन घडविल्याने मिरवणुक लवकर पुढे सरकत होती.