फक्त मुद्द्याचं!

12th February 2026
महाराष्ट्र

पुणे शहराची नवीन क्षेत्रात पदार्पण करून सामर्थ्य निर्माण करण्याची क्षमता: मुख्यमंत्री

पुणे शहराची नवीन क्षेत्रात पदार्पण करून सामर्थ्य निर्माण करण्याची क्षमता: मुख्यमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘पुणे मेट्रोपॉलिटन रिजन ग्रोथ हब’चा शुभारंभ!
पिंपरी : कोणत्याही एका शहराने एखाद्या क्षेत्रावर वर्चस्व गाजविण्यासारखी स्थिती आता राहिली नसून महाराष्ट्रातील अनेक शहरे गतीने विकास करत आहेत. मात्र, पुणे शहर प्रचंड प्रगतशील आणि नाविन्यतेचे केंद्र असून नवीन क्षेत्रात पदार्पण करून आपले सामर्थ्य निर्माण करण्याची या शहरात क्षमता आहे. भविष्यात पुणे निश्चितच भरारी घेईल आणि त्यासाठी ग्रोथ हबच्या माध्यमातून तयार होणारा विकास आरखडा महत्वपूर्ण ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

नीती आयोग, महाराष्ट्र शासन आणि पुणे इंटरनॅशनल सेंटरच्या संयुक्त विद्यमाने यशदा येथे आयोजित ‘पुणे मेट्रोपॉलिटन रिजन ग्रोथ हब’च्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. व्ही. आर. सुब्रह्मण्यम, पुणे इंटरनॅशनल सेंटरचे प्रमुख पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. योगेश म्हसे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘पुणे मेट्रोपॉलिटन रिजन ग्रोथ हब’ला गती देण्याचे काम नीती आयोग करणार आहे. याबाबतचा आराखडा महाराष्ट्र शासन पीएमआरडीए करणार असून त्याला पुणे इंटरनॅशनल सेंटर मदत करणार आहे. नियोजित पद्धतीने विकास केल्यास जीवनशैलीतील सुलभताही साध्य करता येऊ शकते. आज ६५ टक्के जीडीपी शहरांच्या आजूबाजूच्या परिसरातून येतो. योग्य नियोजनातून ही वाढ गतिमान करता येऊ शकते. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ तयार केल्याने चांगली परिसंस्था निर्माण झाली. मात्र यापेक्षाही चांगल्या प्रकारची औद्योगिक विकासाची परिसंस्था तयार केल्यास त्याचा अधिक मोठा परिणाम होईल. आर्थिक वाढीतूनच चांगले सामाजिक वातावरण निर्माण होऊ शकते, असेही मत त्यांनी मांडले.

ग्रोथ हबच्या माध्यमातून पुण्याचे चित्र बदलणार
पुणे हे उत्पादन केंद्र आहे, त्यासोबत हे शहर पूर्वेचे ऑक्सफर्ड म्हणून गणले जाते. उत्कृष्ट शैक्षणिक संस्था असल्याने इथे चांगले मनुष्यबळ तयार होते. कुशल मनुष्यबळ असलेल्या ठिकाणी मोठी गुंतवणूक होते. एआयवर आधारित प्रगती साधण्यासाठी हे मनुष्यबळ महत्वाचे आहे. आज एआय तंत्रज्ञान सर्व क्षेत्रात बदल घडवत आहे. त्याचा लाभ घेऊन जीडीपीच्या वाढीला अधिक गती देता येऊ शकते. पुण्यात ज्या क्षेत्रांची क्षमता आहे त्या क्षेत्रांचे बदलते स्वरुप लक्षात घेवून नियोजन केले तर इथले दरडोई उत्पन्न वाढविता येईल. या प्रत्येक क्षेत्रासाठी आवश्यक धोरण, धोरणातील बदल, महत्वाचे क्षेत्र, त्यासाठीचा दृष्टीकोन, महत्वाच्या बाबी, पायाभूत सुविधा आदींचा विचार ग्रोथ हबच्या माध्यमातून होणार आहे. या माध्यमातून शहरासाठी महत्वाचा दस्तावेज तयार करण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

पुणे शहरासाठी हा दिवस विकासाचे नवे पर्व घेऊन येणारा असल्याचे नमूद करून उपमुख्यमंत्री . शिंदे म्हणाले, महाराष्ट्राच्या विकासाचे ध्येय आणि लोकाभिमुख कल्याणकारी योजनांची सांगड घालण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. परंपरा, पर्यावरण, प्रगती आणि पुणे हे चारही शब्द समानार्थी राहतील अशी पुण्याची वाटचाल राहील.

viara vcc
viara vcc

.सुब्रह्मण्यम यांनी सादरीकरणाद्वारे ग्रोथ हबची माहिती दिली. देशाची अर्थव्यवस्था सध्याच्या ३ ट्रिलियन डॉलर वरुन ५ ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्यासाठी शहराच्या सुनियोजित विकासाची गरज आहे. ग्रोथ हबच्या माध्यमातून मुंबई महानगर क्षेत्राची अर्थव्यवस्था सध्याच्या 140 अब्ज डॉलरवरून येत्या पाच वर्षात दुप्पट म्हणजेच 300 अब्ज डॉलरची करण्याचे नियोजन आहे. पुण्याचीही सध्याची 58 अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था दुप्पट करण्याचे नियोजन आहे. त्यादृष्टीने पुढील ४-५ महिन्यात असा आराखडा तयार करण्यात येईल. पुण्यात उत्पादन केंद्र बनण्याची क्षमता आहे. वाहन उद्योग, माहिती तंत्रज्ञान, अभियांत्रिकी संशोधन, शैक्षणिक सुविधा, कृषीआधारित उद्योग, छोटे आणि मध्यम उद्योग आदी क्षेत्र अशी पुण्याची शक्तीस्थळे आहेत. पुण्याच्या आर्थिक वाढीचा दर १० टक्क्यापर्यंत नेण्याची आवश्यकता आहे. हे शहर जागतिक शहर बनावे यादृष्टीने चांगल्या आराखड्याद्वारे इथली अर्थव्यवस्था 600 अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचे लक्ष्य असले पाहिजे. भविष्यात पुणे जगातील अग्रणी शहर बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

देवरा यांनी प्रस्ताविकात म्हणाले, एमएमआर ग्रोथ हबनंतर पुणे महानगर क्षेत्र ग्रोथ हबची सुरुवात करण्यात येत आहे. अशाच प्रकारे नंतरच्या टप्प्यात नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक येथे ग्रोथ हबची सुरुवात करण्यात येणार आहे. राज्यात असे एकूण पाच ग्रोथ हब उभारण्यात येतील. यावेळी महाराष्ट्र शासन नीती आयोग आणि पुणे इंटरनॅशनल सेंटर यांच्यात पुणे मेट्रोपॉलिटन रिजन ग्रोथ हबच्या अनुषंगाने सामंजस्य करार करण्यात आला.

यावेळी आमदार योगेश टिळेकर, भीमराव तापकीर, राहूल कुल, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, पीएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त दीपक सिंगला, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील आदींसह उद्योग व्यवसाय क्षेत्रातील मान्यवर, पीएमआरडीएचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

‘डेव्हलपिंग सिटी रिजन्स ॲज ग्रोथ हब’ उपक्रमाविषयी
नागरी प्रदेश हे गतिमान विकासाचे केंद्र म्हणून विकसित करण्याच्या दृष्टीने नीती आयोगाने २०२३ मध्ये ‘डेव्हलपिंग सिटी रिजन्स ॲज ग्रोथ हब’ हा उपक्रम हाती घेतला. प्रायोगिक स्वरूपात मुंबई महानगर प्रदेश क्षेत्र (एमएमआर), सुरत वाराणसी आणि विशाखापट्टणम मध्ये हा उपक्रम राबवण्यात येत आहे. आता पुणे महानगर प्रदेश क्षेत्राचाही (पीएमआर) यात समावेश करण्यात आला आहे. आर्थिक गतिमानता, जीवन शैलीतील सुधारणा, आणि शाश्वत कार्यपद्धतींना प्रोत्साहन देणे हे या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे. आर्थिक विकास आराखड्याचा (इकॉनॉमिक मास्टर प्लॅन) इंडिया@२०४७ शी समन्वय साधून एकात्मिक, भविष्यवेधी नागरी आराखड्याच्या दिशेने पाऊल टाकणारा हा देशातील पहिला महानगर प्रदेश आराखडा असणार आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"