१५ अश्वशक्ती पर्यंतच्या कृषीपंपांना मोफत वीज द्या!

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना २०२४’ ही योजना सुरू केली होती. या योजनेअंतर्गत ७.५ अश्वशक्तीपर्यंतच्या कृषीपंपांना मोफत वीज दिली जाते. मात्र, सत्यजीत तांबे यांनी विधान परिषदेत या योजनेच्या निकषांमध्ये बदल करून १५ अश्वशक्तीपर्यंतच्या कृषीपंपांनाही मोफत वीज देण्याची मागणी केली आहे.
राज्यातील ५० टक्क्यांपेक्षा जास्त शेतकरी हे ७.५ हॉर्सपॉवर पेक्षा जास्त क्षमतेचे शेतीपंप वापरणारे आहेत. या शेतकऱ्यांना देखील मोफत वीज मिळावी यासाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना २०२४’ च्या निकषात बदल करून १५ अश्वशक्ती करणे आवश्यक असल्याचे आमदार तांबे यांनी सांगितले.
मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेअंतर्गत ७.५ अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या शेतीपंप वापरणाऱ्यांना शेतकऱ्यांना वीज मोफत दिली जाते. राज्यातील ४४ लाख ३ हजार शेतकऱ्यांच्या ७.५ अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या शेतीपंपांना पूर्णतः मोफत वीज पुरवली जाते. जर निकष बदलले आणि १५ अश्वशक्तीपर्यंतच्या (१५ हॉर्सपॉवर) कृषीपंपांना वीज मोफत दिली तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ होईल, असा विश्वास विधान परिषदेतील आमदार सत्यजीत तांबे यांनी व्यक्त केला.