वेगळ्या विदर्भासाठी आंदोलक पुन्हा आक्रमक

नागपूर, प्रतिनिधी : वेगळ्या राज्याच्या मागणी करीत काही विदर्भवाद्यांनी शनिवारी थेट नागपूर येथे विधानभवनावर विदर्भाचा झेंडा फडकवण्याचा प्रयत्न केला. कडक पोलिस बंदोबस्तमुळे त्यांचा डाव उधळला गेला. मात्र, आंदोलनकर्त्यांनी प्रवेशद्वार आणि परिसरातील वृक्षावर झेंडा फडकविला.
दरम्यान, पोलिसांनी दीडशे महिलांसह ३५० आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन काटोल मार्गावरील पोलिस मुख्यालयात नेले. वेगळे राज्य, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती द्यावी, वीज दरवाढ मागे घ्यावी आणि स्मार्ट मीटर लावू नये आदी मागण्या विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने करण्यात आल्या आहेत. या मागण्यांसाठी त्यांचे सातत्याने आंदोलन सुरू आहे.
सुरुवातीला यशवंत स्टेडियम येथून विधानभवनपर्यंत लाँग मार्च काढण्यात आला. डोक्यावर टोपी, हातात झेंडे आणि फलक घेऊन वेगळा विदर्भ झालाच पाहिजे, महाराष्ट्रवादी चले जाओ, अशा घोषणा देत कार्यकर्ते निघाले. शनि मंदिर, टेकडी मार्गे मोर्चा झिरो माईलकडे येताच पोलिसांनी अडवला. समितीच्या युवा आघाडीचे अध्यक्ष मुकेश मासुरकर यांनी आधीच विधानभवनावर वेगळ्या विदर्भाचा झेंडा फडकवणार या आंदोलनाची घोषणा केल्याने पोलिसांनी विधानभवनाला चहुबाजूनी सुरक्षेचे कडे उभारले होते.
विधानभवनकडे जाणाऱ्या मार्गांवर कडक सुरक्षा बंदोबस्तासह बॅरिकेड्स लावून वाहतूक वळवण्यात आली होती. आंदोलनात कार्यकर्त्यांची संख्या लक्षणीय होती. तरुण मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. मोर्चा अडवल्यानंतर कुणीही मागे हटण्यास तयार नव्हते. अखेर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेणे सुरू केले. पोलिसांनी समितीचे प्रमुख माजी आमदार वामनराव चटप, प्रकाश पोहरे, रंजना मामर्डे, मुकेश मासुरकर यांच्यासह सुमारे दीडशे महिला व दोनशे पुरुष आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. अनेक कार्यकर्त्यांनी रस्त्यातच ठिय्या दिला.
उत्साही कार्यकर्त्यांनी पोलिसांना हुलकावणी देत बॅरिकेड्स पाडले आणि विधानभवनकडे जाण्याचा प्रयत्न केला. काही कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत विधानभवनाच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे कूच केले. तसेच, आत शिरण्यासाठी चढले. पोलिसांनी कार्यकर्त्यांना अडवण्यापूर्वी काही जणांनी प्रवेशद्वारावर विदर्भाचा झेंडा लावला. यानंतर पोलिसांनी त्यांनाही ताब्यात घेतले.