जम्मू काश्मीरमधील झेड-मोर बोगद्याचे उद्घाटन

या प्रकल्पामुळे सोनमर्ग आता पर्यटकांसाठी वर्षभर राहणार खुले
फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज जम्मू – काश्मीरमधील सोनमर्ग बोगद्याचे म्हणजे झेड-मोर (Z-Morh) बोगद्याचे उद्घाटन करण्यात आले. पर्यटकांसाठी सोनमर्ग हा परिसर वर्षभर खुला ठेवण्याच्या उद्देशाने हा बोगदा बांधण्यात आला आहे.
प्रादेशिक विकास आणि केनेक्टिव्हिटीमधील हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. सैनिक आणि देशाच्या सुरक्षेच्यादृष्टीने देखील झेड-मोर प्रकल्पाचे महत्त्व आहे. हा प्रकल्प सुमारे २,७०० कोटी रुपयांचा आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत या बोगद्याचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचाही पंतप्रधान मोदी यांनी भेट घेतली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, जम्मू काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा, मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लाह यावेळी उपस्थित होते. येथील विधानसभा निवडणुकांनंतर पंतप्रधानांचा जम्मू-काश्मीरमधला हा पहिलाच दौरा होता.
कसा आहे झेड-मोर बोगदा?
गगनगीर ते सोनमर्ग पर्यंत हा झेड – मोर मार्ग पसरला आहे. तो ६.५ किलोमीटर लांबीचा आहे. जम्मू काश्मीरमधील सोनमर्ग हे ठिकाण पर्यटकांचे आकर्षण राहिले आहे. येथील बर्फवृष्टी अनुभवण्यासाठी भारताच्या विविध भागातून लोक येतात. हिवाळ्यातील येथील तापमान उणे २५ अंश सेल्सिअसपर्यंत येते. त्यावेळी देशाच्या अन्य भागापासून सोनमर्ग जवळपास संपर्काच्या टप्प्यातच नसते. या बोगद्यामुळे पहलगाम आणि गुलमर्ग येथे पर्यटक जसे वर्षभर जाऊ शकतात, तसेच सोनमर्ग येथेही वर्षभर येऊ शकतील. लेह-लडाखमध्ये राहणाऱ्यांना, सैनिकांना देखील याचा लाभ होणार आहे. या बोगद्यात दोन लेन आहेत. वाय-फाय कनेक्टिव्हिटी आणि सीसीटिव्ही कॅमेरे बोगद्यात लावण्यात आले आहेत. समुद्रसपाटीपासून ८,६५० फूट उंचावर हे ठिकाण आहे. सगळ्या ऋतूंमध्ये श्रीनगर आणि सोनमर्ग दरम्यान दळणवळण सुरू राहण्यास या बोगद्याची मदत होणार आहे.