फरारी निलेश चव्हाणची मालमत्ता जप्त करण्यासाठी तयारी!

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण
पिंपरी : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात बाळाची हेळसांड केली म्ह्णून नीलेश रामचंद्र चव्हाण (रा. कोथरुड, पुणे) याला सहआरोपी केले आहे. चव्हाण अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. लुक आऊट नोटिशीनंतर आता चव्हाणची मालमत्ता जप्त करण्याची कार्यवाही पोलिसांनी सुरु केली आहे. न्यायालयाची परवानगी मिळताच स्टँडिंग वॉरंटस बजावण्यात येणार आहे, असे पोलिसांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
वैष्णवी शशांक हगवणे हिने १६ मे रोजी आत्महत्या केली. याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत असलेल्या बावधन पोलिस ठाण्यात दि. १७ मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. भारतीय न्याय संहिता कलम ८० (२), १०८, ११५ (२), ३५२, ३५१ (२), ११८ (१), ३ (५) प्रमाणे बावधन पोलिसांनी गुन्हा नोंद केला. हुंडाबळी आणि मृत्यूस कारणीभूत ठरणे असा गुन्हा दाखल केला. त्यानंतर वैष्णवीचे दहा महिन्यांचे बाळ नीलेश चव्हाण सापडले. चव्हाण याच्याकडे असताना बाळाची हेळसांड झाली, अशी तक्रार कस्पटे कुटुंबियांनी केल्यानंतर बावधन पोलिसांनी गुन्ह्यातील कलमांमध्ये वाढ केली. तेव्हांपासून चव्हाण फरार आहे. त्यानंतर रविवारी देशाबाहेर पलायन करण्यापासून रोखण्यासाठी लुक आऊट नोटीस जारी केली होती. तरीही चव्हाण पोलिसांच्या हाती ना सापडल्याने त्याची मालमत्ता जप्त करण्यासाठी स्टँडिंग वॉरंट बजवण्यात येणार आहे.

स्टँडिंग वॉरंटसाठी न्यायालयाकडे अर्ज ; विशाल गायकवाड (पोलीस उपायुक्त)
पिंपरी- चिंचवड पोलिसांनी निलेश चव्हाणच्या शोधासाठी विशेष सहा पथकांची स्थापना केली आहे. या पथकांनी विविध ठिकाणी तपास सुरू केला आहे, ज्यामध्ये पुणे, मुंबई, कोकण तसेच कर्नाटक आणि गोवा भागांचा समावेश आहे. तो राज्याबाहेर गेला असावा, असा अंदाज आहे. त्याचबरोबर त्याचे मित्र, नातेवाईक व संपर्क असलेल्या व्यक्तींकडेही चौकशी सुरू आहे. त्यामुळे स्टँडिंग वॉरंटसाठी न्यायालयाकडे अर्ज सादर केला आहे. त्यानंतर चव्हाणच्या मालमत्तेची माहिती एकत्रित करून जप्त करण्याची कारवाई केली जाणार आहे.