राज्यात मतमोजणीची तयारी पूर्ण

सकाळी आठ वाजता टपाली मतमोजणीने होणार प्रारंभ
फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
मुंबई, प्रतिनिधी : राज्यात सर्वत्र उद्या मतमोजणीचा दिवस आहे. विधानसभेच्या २८८ जागांसाठी बुधवारी मतदान पार पडल्यानंतर आता मतमोजणीची उत्सुकता आहे. सकाळी आठ वाजता एकाच वेळी सगळीकडे मतमोजणीला प्रारंभ होणार आहे.
राज्यात सगळ्या मतदार संघांमध्ये तयार करण्यात आलेल्या स्ट्राँगरूममध्ये चोख बंदौबस्तात मतदान यंत्रे ठेवण्यात आली आहेत. मतमोजणी केंद्रांवर तयारी पूर्ण झाली असून, चोख सुरक्षा ठेवण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली ही मतमोजणी पार पडणार आहे. नेहमीप्रमाणे पोस्टल मतदानाने मतमोजणीला प्रारंभ होईल. निवडणूक कर्मचारी, पोलिस यंत्रणेतील कर्मचारी, ८५ वर्षांपेक्षा अधिक वृद्ध, विकलांग यांच्यासाठी ही सुविधा होती.
८५ पेक्षा अधिक वयाचे ६८ हजार मतदार
या निवडणुकीतमध्ये ८५ वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या मतदारांची संख्या तब्बल ६८ हजार होती. तर १२ हजार दिव्यांग व्यक्तींनी गृह मतदानाचा हक्क बजावला आहे. अत्यावश्यक सेवेतील ३६ हजाराहून अधिक मतदारांनी पोस्टल मतपत्रिकेद्वारे मतदान केले आहे. २८८ मतमोजणी केंद्रांवर एक हजार ७२३ टेबल्स ही टपाल मतपत्रिकांच्या मोजणईसाठी आणि ५९२ टेबल्स ETPBMS स्कॅनिंगसाठी उभारण्यात आली आहेत.
निवडणूक लढविणारा उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी आणि निरीक्षक यांच्या समक्ष सीलबंद स्ट्राँगरूम्स उघडण्यात येतील. सीसीटिव्हीद्वारे प्रत्येक हालचाली टिपल्या जाणार आहेत. तसेच स्ट्राँगरूम उघडण्यापासून प्रत्येक कृती कॅमेरामध्ये बंद होईल. निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर निकाल अपडेट केला जाणारआहे.
(संग्रहित छायाचित्र)