फक्त मुद्द्याचं!

30th April 2025
पुणे

मान्सूनपुर्व कामांचे नियोजन करुन कामे वेळेत पुर्ण करावीत : जिल्हाधिकारी डुडी

मान्सूनपुर्व कामांचे नियोजन करुन कामे वेळेत पुर्ण करावीत : जिल्हाधिकारी डुडी

पुणे : मान्सूनपुर्व करावयाचे कामांचे सुक्ष्म नियोजन करुन ती सर्व कामे पावसाळ्यापूर्वी वेळेत पूर्ण करावीत, कामे करतांना सर्व सबंधित यंत्रणांनी एकमेकांशी समन्वय ठेवावा. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना आवश्यक त्या सर्व सोई-सुविधा मिळतील तसेच त्यांची गैरसोय टाळण्याच्यादृष्टीने नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठकीत जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र डूडी यांनी दिले.

याबैठकीत निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकरी विठ्ठल बनोटे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे, कृषी, आरोग्य, पुणे व पिंपरी चिंचवड महानगर पालिका, नगर परिषद, पुणे प पिंपरी चिंचवड शहर आयुक्तालय, जिल्हा अधीक्षक पुणे ग्रामीण कार्यालय, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, महावितरण, वन विभाग, वन, प्रादेशिक परिवहन कार्यालय, भारतीय हवामान विभागासह सर्व संबंधित विभागांचे उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार, मुख्याधिकारी (दूरदृष्यप्रणालीद्वारे) उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डुडी म्हणाले, पाटबंधारे विभागाने पूररेषा निश्चित करुन त्याची माहिती प्रशासनाला, महापालिकांना द्यावी. त्याप्रमाणे पूररेषेखाली येणाऱ्या झोपडपट्ट्या, अतिक्रमणे काढण्याची कार्यवाही संबंधितांनी करावी. पाणी पातळीत वाढ झाल्यानंतर करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत पूर नियंत्रण आराखडा निश्चित करावा. धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याबाबत नागरिकांना पूर्वसूचना वेळेत मिळेल याबाबत नियोजन करावे. सर्व धरणांची बांधकाम तपासणी पावसाळ्यापूर्वी करुन घ्यावी.

viarasmall
viarasmall

सार्वजनिक बांधकाम विभागाने धोकादायक तसेच अतिधोकादायक ठिकाणे, गावे, पुल, रस्ते, पूरबाधित गावे आदीबाबतची माहिती सर्व संबंधित विभाग तसेच नागरिकांना माहिती द्यावी. धोकादायक तसेच अतिधोकादायक ठिकाणे, गावे, पुल, रस्ते, पूरबाधित गावांची पाहणी करुन आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. सर्व रस्त्यांना बाजुला पट्टे भरुन घ्यावेत. पावसाळ्यात बंद रस्त्याला असलेले पर्यायी रस्त्याबाबत माहिती नागरिकांना द्यावी. आणीबाणीच्या वेळी उपयोगात येणारी बुलडोझर्स, वॉटरटँकर्स, डंपर्स, अर्थमुव्हर्स, डिवॉटरींग पंप्स, जनरेटर्स, ट्री कटर्स, फल्ड लाईट, आर.सी.सी.कटर्स, इत्यादी साहित्याची चालू स्थितीमध्ये असल्याबाबत याची खात्री करुन घ्यावी.

आरोग्य विभागाने संभाव्य आपत्कालिन परिस्थितीचा विचार करुन नागरिकांना तात्काळ सेवा मिळेल, याबाबत नियोजन करावे. तालुकानिहाय रुग्णालय, खाटा, वैद्यकीय अधिकारी, रुग्णवाहिका, रक्तपेढी, औषधे साठा तयार ठेवावे. साथीचे रोग व उपचारपद्धती आदीबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, याबाबत नागरिकांना माहिती द्यावी. मान्सून काळात सर्पदंशाचे प्रमाण लक्षात घेऊन पुरेसा सर्पविष प्रतिबंधक लस साठा उपलब्ध ठेवावा.
आपत्कालिन परिस्थितीचा विचार करुन कृषी विभागाने गावनिहाय पथके गठीत करावी. जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी मुबलक अन्नधान्याचा साठा उपलब्ध करुन द्यावा. पूरबाधित गावाच्या अनुषंगाने आपत्कालीन यंत्रणा सर्व विभागांच्या समन्वयाने सज्ज ठेवावी. संबंधित विभागाने जिल्हास्तरापासून ते गावपातळीपर्यत आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करावा, नागरिकांना सोप्या भाषेत परंतू अद्ययावत माहिती देण्याची कार्यवाही करावी. उपविभागीय अधिकारी यांनी तालुकानिहाय आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करावा, त्याबाबतची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडे सादर करावी तसेच याबाबत नागरिकांना माहिती द्यावी. यावेळी सर्व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी मान्सून पूर्व तयारीच्या अनुषंगाने करीत असलेल्या तयारीबाबत माहिती दिली.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"