मान्सून पूर्व पावसाची पिंपरीत हजेरी

पिंपरी ः राज्यात यंदा मान्सून पूर्व पावसाने दमदार हजेरी लावल्याने खरीप हंगामातील पेरणी पूर्व मशागतीला शेतकऱ्यांनी जोरदार सुरुवात केली असून शेतात पेरण्या करून पांडुरंगाच्या दर्शनासाठी आनंदाने पालखी सोहळ्यात सामील होण्यासाठी लगबग सुरू केली आहे.
यंदाच्या वर्षी राज्यात सरासरी पेक्षा जास्त प्रमाणात पाऊस पडण्याचे संकेत हवामान खात्याने दिले आहेत. राज्यात सर्व दूर ठिकाणी मान्सून पूर्व पाऊसाने दमदार हजेरी लावली आहे. दुष्काळी भागात देखील पाऊस पडला आहे. यंदा मान्सून वेळेत सुरू होईल असे हवामान खात्याने संकेत दिले आहेत, मात्र महाराष्ट्रात तळ कोकण भागात मान्सून दाखल झाला, मात्र तो कोकणातच स्थिरावला आहे.
लवकरच मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात पसरेल असा दावा हवामान खात्याने केला आहे. खरीप हंगामात बाजरी, भुईमुग, सोयाबीन, कपासी, भात पेरणीला शेतकरी प्राधान्य देतो. मान्सून पूर्व पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकरी आनंदात असून लगबगीने पेरणीच्या मशागती करून पांडुरंग दर्शनासाठी पालखी सोहळ्यात निर्धास्त पणे सामील होण्यासाठी इच्छुक आहे. यंदा पाऊसाने वेळेत हजेरी लावल्याने पालखी सोहळ्यातील वैष्णवांची मांदियाळी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.