फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
देश विदेश

प्रयागराज महाकुंभमेळा; लोटला भाविकांचा महासागर!

प्रयागराज महाकुंभमेळा; लोटला भाविकांचा महासागर!

पहिले शाही स्नान ‘मकरसंक्राती’ १४ जानेवारीला
प्रयागराज : जगातील सर्वाधिक माणसांचा संगम करणाऱ्या हिंदू धर्मातील पवित्र महाकुंभमेळ्यास सोमवारपासून येथे प्रारंभ झाला आहे. गंगा, यमुना व विलुप्त सरस्वतीच्या पवित्र संगमावर प्रयागराज येथे हा कुंभमेळा होत आहे. दर १२ वर्षांनी होणाऱ्या महाकुंभसाठी लाखो साधू-संतांसह जगभरातील लाखो भाविकही प्रयागराजमध्ये दाखल झाले आहेत. ४५ दिवस चालणाऱ्या या कुंभमेळ्यात जवळपास ४० कोटीहून अधिक भाविक येण्याची शक्यता आहे. या मेळ्यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. महाकुंभातील पहिले शाही स्नान १४ जानेवारीला ‘मकरसंक्राती’च्या दिवशी होणार आहे. या कुंभमेळ्यात एकूण तीन शाही स्नान होतील.३ जानेवारी ते २६ फेब्रुवारीदरम्यान ‘महाकुंभ २०२५’ होणार आहे.

मकर संक्रातीला पहिले शाही स्नान होणार आहे. यासाठी १०.५ किमीचा घाट तयार केला आहे. कुंभमेळ्यात स्नानपर्व सुरू होण्यापूर्वी आतापर्यंत 1.5 कोटी भाविकांनी प्रयागराज येथील त्रिवेणी संगमात पाण्यात डुबकी मारली आहे. कुंभमेळ्यासाठी खास ५५ पोलीस स्थानके उभारण्यात आली असून ४५ हजार पोलीस सुरक्षेसाठी तैनात केले आहेत.

पौराणिक कथेनुसार, समुद्र मंथनातून अमृतकुंभ म्हणजे अमृताने भरलेलं भांडं बाहेर आलं. हे अमृत देव आणि असुरांमध्ये वाटण्यासाठी देवतांनी कुंभ हाती घेतलं. त्यावेळी, भगवान विष्णूने मोहिनी रूप धारण करून अमृत वाचवलं आणि ते वाहून नेताना चार ठिकाणी काही थेंब जमिनीवर पडले. याच चार पवित्र ठिकाणी दर १२ वर्षांनी कुंभमेळ्याचं आयोजन केलं जातं. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या ग्रहस्थितीनुसार आणि ज्योतिषशास्त्राच्या हिशोबानं या मेळ्याची वेळ ठरवली जाते. शतकानुशतके प्रयागराज इथं माघ मेळ्याचा उत्सव साजरा केला जातो. अनेक पुराणांमध्ये या वार्षिक मेळ्याचा उल्लेख आहे. कुंभमेळा हा फक्त धार्मिक उत्सव नसून, भारतीय संस्कृतीचा आत्मा आहे.

दर दिवशी दोन कोटी भाविक येण्याची अपेक्षा
प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, स्नानाच्या दिवशी २ कोटीहून अधिक भाविक येतील. तर २९ जानेवारीला पौष अमावस्येला १० कोटी भाविक येण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, महाकुंभमेळ्याच्या निमित्ताने भारताच्या प्राचीन व धार्मिक परंपरा जगासमोर येणार आहेत. या कुंभमेळ्यासाठी १० हजार एकर जागेवर व्यवस्था केली आहे. स्वच्छता, सुरक्षा व आधुनिकतेचा संगम यात पाहायला मिळेल. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. या उत्सवासाठी जगातील सर्वात मोठे तात्पुरते शहर उभारले आहे. या शहरात ५० लाख ते १ कोटी भाविक सामावले जाऊ शकतात, असे त्यांनी सांगितले.

कुंभ कुठे आयोजित केला जातो?
महाकुंभ हा हिंदू धर्माचा महत्वाचा धार्मिक उत्सव आहे. महाकुंभचे आयोजन दर १२ वर्षांनी केले जाते. यात भाविक श्रद्धेने पवित्र नद्यांमध्ये डुबकी मारतात. त्यामुळे पुण्य मिळते, अशी श्रद्धा आहे. महाकुंभाचे आयोजन प्रयागराजच्या संगमावर, हरिद्वार येथे गंगेत, उज्जैनमध्ये शिप्रा नदी आणि नाशिकच्या गोदावरी नदीवर केले जाते.

स्नान व शाही स्नानाचे वेळापत्रक
१३ जानेवारी (सोमवार) – पहिले स्नान
१४ जानेवारी – पहिले शाही स्नान, मकर सक्रांत
२९ जानेवारी – शाही स्नान, मौनी अमावस्या
३ फेब्रुवारी – शाही स्नान, वसंत पंचमी
१२ फेब्रुवारी – स्नान, माघ पौर्णिमा
२६ फेब्रुवारी – स्नान, महाशिवरात्रि

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"