दर्जेदार काम घडविण्यासाठी निर्माती झाले..

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
मुंबई, प्रतिनिधी : आपण स्वतः थेट उतरून काम करत नाही, तोपर्यंत मनासारखं आणि दर्जेदार काम हाती लागत नाही, यावर मी ठाम होते. आणि नर्तिका म्हणून मला सिनेमात मुख्य भूमिका साकारायचीच होती. त्यामुळे केवळ अभिनेत्री ही मर्यादा ओलांडून मी निर्माती म्हणून पाऊल टाकलं, असे अभिनेत्री आणि निर्माती प्राजक्ता माळी हिने सांगितले.
फुलवंती या सिनेमाबद्दलचे अनुभव एका कार्यक्रमात सांगताना ती बोलत होती. ती म्हणाली की, लेखक दिग्दर्शक मित्र दिग्पाल लांजेकर याने मला ‘फुलवंती’ या कादंबरी विषयी सांगितलं. लगोलग मी ती वाचली आणि समोर चित्र उभं राहिलं. माझ्या लक्षात असं लक्षात आलं की, आपण स्वतः यात थेट उतरत नाही तोवर ते माझ्या मनासारखं आणि दर्जेदार होणार नाही. त्यामुळे केवळ अभिनेत्री म्हणून न राहता निर्माती म्हणून मी उभी राहिले; सोबत मित्र परिवार यांचं सहकार्य लाभलंच.
फुलवंतीमधील भूमिकेविषयी..
प्राजक्ता माळी सांगते की, ‘फुलवंती’मधील माझी भूमिका वेगळी आहे. त्यामागचं कारण म्हणजे, ‘माझी दिग्दर्शिका आणि निर्माता ही स्त्री आहे.’ तिच्या नजरेतून आणि तिच्या निर्मितीत मी दिसणार आहे. माझ्यासाठी ही अत्यंत सकारात्मक आणि अभिमानाची बाब आहे. जर आज मी एका ‘स्त्री’ नजरेतून पडद्यावर प्रतिबिंबित होणार आहे; ती भूमिका नक्कीच प्रेक्षकांना आवडेल. सिनेमाचं वाचन मला प्रचंड आवडलं होतं. कथानकात शास्त्रीची भूमिका ही अत्यंत पूरक आहे. सिनेमा पाहताना ‘शास्त्री’ पुन्हा पडद्यावर येण्याची प्रेक्षक वाट पाहतील. प्रेक्षकांचं प्रतिबिंब असलेला तो शास्त्री आहे. त्यामुळे ही भूमिका मला विशेष भावली, असे गश्मीर महाजनीने सांगितले.
मराठी चित्रपटसृमध्ये आजपर्यंत उत्तम आणि आशयघन सिनेमे प्रेक्षकांना दिले आहेत. उत्तम कलाकृती घडविताना केवळ चांगली संकल्पना असून चालत नाही तर तितक्याच ताकदीची कलाकार, तंत्रज्ञ, दिग्दर्शक अशी फौज हाताशी लागते. फुलवंती हा सिनेमा लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना आवडेल. ‘फुलवंती’ ही भारतभर किर्ती असलेली नर्तिका आहे. अशाच एका कार्यक्रमाच्या निमित्तानं तिचं पुण्यात- पेशवे दरबारात येणं होतं. तिथे तिची व्यंकटध्वरी नरसिंह शास्त्री यांच्याशी भेट होते. त्यांच्या भेटीनंतर तिच्या आयुष्याला अनपेक्षित वळण लागतं. नृत्यांगना ‘फुलवंती’ आणि प्रकांडपंडीत ‘व्यंकट शास्त्री’ यांच्यातील पैज व आव्हानावर हा चित्रपट बेतला आहे. कला व बुद्धिमत्तेतील युद्ध आपण यात पाहणार आहोत, असे प्राजक्ता म्हणाली.