एमआयडीसी असलेल्या गावांना औद्योगिक नगरी दर्जा देण्यासंदर्भात धोरण :मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई: महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ एमआयडीसी असलेल्या गावांना औद्योगिक नगरी दर्जा देण्यासंदर्भात धोरण करण्याचा निर्णय करण्यात आला असून याबाबतचे धोरण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीत दिल्या .एमआयडीसीची आढावा बैठक मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्योग मंत्री उदय सामंत मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव अश्विनी भिडे सचिव श्रीकर परदेशी उपमुख्यमंत्री कार्यालयाचे अप्पर सचिव असीम कुमार गुप्ता सचिव नवीन सोना उद्योग सचिव डॉक्टर अनबलगन उपस्थित होते .
औद्योगिक क्षेत्राचा विकास अधिक वेगाने करण्यासाठी एमआयडीसी असलेल्या अशा गावांना औद्योगिक नगरीचा दर्जा दिल्यास गावांच्या विकासाबरोबर संबंधित भागात मूलभूत सुविधा आणि पायाभूत प्रकल्पांचा विकास वेगाने होईल .त्याचप्रमाणे पाणीपुरवठा रस्ते वीज आणि इतर सुविधा सुधारणे यावर भर दिला जाईल, असे फडणवीस यांनी सांगितले .अनेक गावांमध्ये एमआयडीसी आहे ,परंतु प्राथमिक सुविधा आणि विकास यांचा अभाव असल्याने उद्योजक या ठिकाणी गुंतवणूक करण्यास तयार होत नाहीत. गावांचा विकास करण्यासाठी त्यांना औद्योगिक नगरी देण्यासंदर्भात धोरण केल्यास विकासाला चालना मिळेल आणि नागरी सुविधा देखील पुरवता येतील असे त्यांचे म्हणणे आहे.

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम 2025 मध्ये 63 करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. त्यातील 47 करार उद्योगांशी संबंधित आहेत, या कराराप्रमाणे कंपन्यांना जमीन वाटपाचे काम पूर्ण करायचे आहे. नवीन औद्योगिक क्षेत्रांसाठी भूसंपादनाची आधीसूचना प्रकाशित करण्यात येत आहे. ई निविदा पद्धतीने महा टेंडर्स पोर्टलवर 654 भूखंडाचे वाटप करण्यात आले आहे शंभर दिवस कृती आराखड्यात दिलेल्या कार्यक्रमानुसार महामंडळाने साडेतीन हजार एकर औद्योगिक भूखंड देण्याचे उद्दिष्टाआहे. जमीन अधिग्रणाचे 110% उद्दिष्ट पूर्ण झाले आहे असे फडणवीस यांनी सांगितले.