रावण टोळीचा सशस्त्र दरोड्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला!

सहा सराईत गुन्हेगारांना अटक ; तीन अल्पवयीन मुलांचा समावेश
पिंपरी : ज्वेलर्सच्या दुकानावर सशस्त्र दरोडा टाकण्यासाठी ऑडी कार मधून आलेल्या रावण टोळीचा डाव पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या वतीने उधळून लावण्यात आला .सहा जणांना अटक केली असून तीन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी पिस्तूल ,कोयता अशा घातक शास्त्रासह ताब्यात घेतले आहे. ही कारवाई बुधवार 17 सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता करण्यात आली.

पोलिसांनी अनिरुद्ध उर्फ बाळ्या उर्फ विकी राजू जाधव ( वय 28 रावेत), अभिषेक उर्फ बकासुर चिमाजी पवार (वय 22 चिंचवड ), यश उर्फ गोंद्द्या आकाश खंडागळे ( वय 21 निगडी ), शुभम गोरखनाथ चव्हाण (वय 30 आकुर्डी), प्रद्युम्न राजकुमार जवळगे (वय 25 चाकण ), सोहम राजू चंदेलिया ( वय 23 रावेत ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत .
पोलीस उपायुक्त डॉक्टर शिवाजी पवार यांनी याबाबत माहिती दिली. चिखली येथील पाटील नगर परिसरातील एका ज्वेलर्सच्या दुकानावर सशस्त्र दरोडा घालण्याच्या तयारीने आरोपी आले होते .स्विफ्ट आणि ऑडी कार मधून आरोपी दरोडा टाकण्यासाठी आले असल्याची माहिती गुंडाविरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावला .दोघेजण कारच्या बाहेर थांबून पाहणी करत होते, तर इतर सात जण कार मध्ये बसून होते . पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून दोन कार , पिस्तूल , जिवंत काडतुसे , कोयता , गुप्ती , मिरची पूड , बांबू ,दोरी असा एकूण 15 लाख 25 हजार 974 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला .
आरोपी अनिरुद्ध जाधव यांच्यावर पोलिसांनी मोका ची कारवाई केली आहे. त्या गुन्ह्यात तो गेले अनेक महिन्यापासून फरार आहे . त्याच्या विरोधात निगडी, देहूरोड , वाकड , चिंचवड , जळगाव , चोपडा , उत्तम नगर ,ठाणे पोलीस स्टेशन मध्ये खुनासाठी अपहरण , दरोडा, खुनाचा प्रयत्न , शस्त्र बाळगणे असे दहा गंभीर गुन्हे दाखल आहेत . यश खंडागळे याच्या विरोधात निगडी पोलीस ठाण्यात दोन गंभीर गुन्हे दाखल आहेत त्यातील एका गुन्ह्यात तो फरार होता .सोहन चंदेलिया याच्या विरोधात तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे . ही कामगिरी गुंडाविरोधीपतकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने ,पोलीस उपनिरीक्षक समीर लोंढे, पीपी तापकीर सहाय्यक उपनिरीक्षक, एस एन ठोकळ, व्ही एच जगदाळे, एपी गायकवाड , जी डी चव्हाण , एच डी चौधरी , जी एस मेंदगे , एस पी बाबा, एन पी गेंगजे , एम एस दळवी ,आर के मोहिते ,व्ही एन वेळापुढे, एस पी घारे, डी व्ही गिरी , एस टी कदम, टी ई शेख यांनी केली आहे.

