फक्त मुद्द्याचं!

5th March 2026
पुणे

पीएमआरडीएच्या फुटबॉल मैदानांची कामे अंतिम टप्प्यात; आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा सज्ज!

पीएमआरडीएच्या फुटबॉल मैदानांची कामे अंतिम टप्प्यात; आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा सज्ज!

अतिरिक्त महानगर आयुक्त दीपक सिंगला यांच्याकडून पाहणी
पुणे: पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो, रिंग रोड आणि इंद्रायणी-पवना नदी सुधार प्रकल्पांसारख्या ‘मेगा’ प्रकल्पांनंतर आता आपला मोर्चा शहरातील क्रीडा संस्कृतीकडे वळवला आहे. पिंपरी-चिंचवडमधील सेक्टर ३ आणि १२ येथील ‘पीएमआरडीए’च्या आरक्षित भूखंडांवर आंतरराष्ट्रीय मानकांनुसार ‘फुटबॉल आणि मल्टी-युटिलिटी गेम अरेना’ उभारण्यात येत असून, या प्रकल्पांची कामे आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहेत. ‘पीएमआरडीए’चे अतिरिक्त महानगर आयुक्त दीपक सिंगला यांनी गुरुवारी (दि. ५) या दोन्ही प्रकल्पांची प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला.

viara vcc
viara vcc

सेक्टर ३ येथील ३,५०० चौरस मीटर क्षेत्रफळावर विकसित होत असलेल्या क्रीडा संकुलाचे सुमारे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. येथे ४४ मी. x ३० मी. आकाराचे फुटबॉल टर्फ तयार करण्यात येत असून ‘स्क्वॅश कोर्ट’ हे या प्रकल्पाचे मुख्य आकर्षण ठरणार आहे. या ठिकाणी ४० हून अधिक प्रेक्षकांसाठी आसनव्यवस्था (सिटिंग स्टेडियम), युटिलिटी बिल्डिंग, संरक्षक भिंत आणि भूमिगत पाणी साठवण टाकीची कामे पूर्ण झाली आहेत. सध्या मैदानावर टर्फ बसवणे आणि अंतर्गत पेव्हिंग ब्लॉकचे काम प्रगतीपथावर आहे.

सेक्टर १२ येथील प्रकल्प अधिक व्यापक असून, १,३०,६०० चौरस मीटरच्या विस्तीर्ण क्षेत्रावर क्रीडा सुविधा आकारास येत आहेत. या प्रकल्पाचे ६५ टक्के काम पूर्ण झाले असून येथे ६८ मी. x १०५ मी. या ‘फिफा’ (FIFA) मानक आकाराचे फुटबॉल टर्फ विकसित केले जात आहे. ४०० हून अधिक क्रीडाप्रेमी बसू शकतील असे भव्य स्टेडियम येथे उभारले जात आहे. सध्या मैदानाचे परफोरेटेड पाईप आणि जी.एस.बी. (GSB) स्तर पूर्ण झाले .आसनव्यवस्था व युटिलिटी बिल्डिंगचे बांधकाम वेगाने सुरू आहे.

या पाहणी दौऱ्यावेळी महानगर मुख्य अभियंता रिनाज पठाण, अधीक्षक अभियंता योगेश कुलकर्णी, कार्यकारी अभियंता उमेश मल्लावत, कनिष्ठ अभियंता चैतन्य भोर, जयदीप देशमुख यांच्यासह प्रकल्प व्यवस्थापक आणि कंत्राटदार उपस्थित होते. शहराच्या झपाट्याने होणाऱ्या विस्तारात मोकळ्या जागा आणि क्रीडांगणांचे महत्त्व अधोरेखित करत पीएमआरडीएने उभारलेली ही मैदाने फुटबॉलप्रेमींसाठी पर्वणी ठरणार आहेत. अत्याधुनिक ड्रेनेज सिस्टिम आणि दर्जेदार टर्फमुळे पावसाळ्यातही ही मैदाने खेळाडूंसाठी खुली राहू शकतील, असा विश्वास पीएमआरडीएने व्यक्त केला आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"