जमीन परतावाबाबत पीएमआरडीएकडून शेतकऱ्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन!

मंगळवारी (दि.९ सप्टेंबर) रोजी सकाळी ११ वाजता; ग.दी. माडगूळकर सभागृह
पिंपरी : तत्कालीन पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणासाठी सन १९७२ ते १९८३ या कालावधीत ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या अशा जमिनीकरिता संबंधित जमीन मालकांना / वारसांना ६.२५ टक्के जमीन परतावा देण्यात येत आहे. संबंधित शेतकऱ्यांना याबाबत माहिती अवगत व्हावी, यासाठी मंगळवारी (दि.९ सप्टेंबर) रोजी सकाळी ११ वाजता पीएमआरडीएच्या माध्यमातून ग.दी. माडगूळकर सभागृहात संवाद साधण्यात येणार आहे.

प्राधिकरणासाठी जमिनी संपादित केलेल्या संबंधित जमीन मालकांना / वारसांना ६.२५ टक्के प्रमाणे जमीन परतावा देण्याबाबत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. यासाठी काही लाभार्थ्यांनी अर्ज केले असून त्यावर कार्यवाही होत आहे. मात्र अद्यापही काही पात्र लाभार्थ्यांनी पीएमआरडीएकडे अर्ज सादर केलेले नाही तसेच काही जणांचे अर्ज कागदपत्रांअभावी त्रुटीमध्ये आढळून येत आहे. त्यामुळे ६.२५ टक्के परताव्यासाठी आवश्यक कागदपत्रे, परतावा अर्ज, कार्यपद्धती व इतर अनुषंगिक बाबींच्या अनुषंगाने संबंधित शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी मंगळवारी संबंधित शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन पीएमआरडीएच्या जमीन व मालमत्ता विभागाचे सह आयुक्त हिम्मत खराडे यांनी केले आहे.