फक्त मुद्द्याचं!

6th September 2025
महाराष्ट्र

पिंपरी चिंचवड पालिकेचे ‘सावली’ बेघर निवारा केंद्र ठरले राज्यात सर्वोत्कृष्ट!

पिंपरी चिंचवड पालिकेचे ‘सावली’ बेघर निवारा केंद्र ठरले राज्यात सर्वोत्कृष्ट!

राज्यस्तरीय निवारा सनियंत्रण समितीने केलेले निरीक्षण
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने दीनदयाळ अंत्योदय योजना – राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत सुरू केलेले ‘सावली’ बेघर निवारा केंद्र शहरातील गरजू, बेघर व असहाय्य नागरिकांसाठी एक मोठा आधार बनले आहे. राज्यस्तरीय निवारा सनियंत्रण समितीने नुकत्याच केलेल्या निरीक्षणामध्ये हे केंद्र राज्यामध्ये सर्वोत्कृष्ट ठरले आहे.

नागरी बेघरांना निवारा या घटकाच्या प्रगतीचे सनियंत्रण करण्यासाठी शासन निर्णयान्वये राज्यस्तरीय निवारा सनियंत्रण समिती गठीत करण्यात आलेली आले. या समितीने त्रयस्थ संस्थेद्वारे राज्याच्या विविध शहरात असणाऱ्या निवाऱ्यांचे निरीक्षण करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार त्रिशरण एनलायनमेंट फाऊंडेशन या संस्थेने निवारा निरीक्षण करून अहवाल सादर केला. या अहवालामध्ये सर्वोत्कृष्ट ५ निवाऱ्यांची निवड करण्यात आली असून त्यामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सावली बेघर निवारा हे केंद्र प्रथम क्रमांकावर आहे. तर ग्रेस बेघर निवारा (बृहन्मुंबई महानगरपालिका), शहरी बेघर निवारा (अंबरनाथ नगरपरिषद) यांना अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळाला आहे. चौथ्या क्रमांकावर संत गाडगेबाबा बेघर निवारा (अकोला महानगरपालिका) आणि पाचव्या क्रमांकावर जिव्हाळा बेघर निवारा (बीड नगरपरिषद) आहे.

वर्ष २०२० मध्ये झाली केंद्राची सुरुवात
पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीत २०१९ मध्ये त्रयस्थ संस्थेमार्फत करण्यात आलेल्या सर्वेक्षणात शहरात एकूण १५२ बेघर लाभार्थी आढळून आले. त्यानंतर दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत ऑक्टोबर २०२० मध्ये सावली निवारा केंद्र सुरू करण्यात आले. पिंपरी भाजी मंडईच्या पहिल्या मजल्यावर १९ हजार ८६ चौरस फुट जागेवर हे केंद्र उभारण्यात आले असून याची निवास क्षमता १११ व्यक्तींपर्यंत आहे. हे केंद्र रेल्वे स्थानकापासून केवळ अर्धा किलोमीटर आणि बसस्थानकापासून ३ किलोमीटर अंतरावर आहे.

viarasmall
viarasmall

सावली निवारा केंद्रात पुरुष, महिला, बेघर कुटुंबे आणि दिव्यांग व्यक्तींकरिता स्वतंत्र व्यवस्था व सुरक्षित सोयी पुरविल्या आहेत. निवारा केंद्रामध्ये एकूण २३ रुम असून बेघर कुटुंबांसाठी ७ रुम देखील उपलब्ध आहेत. पुरुषांसाठी ५ स्नानगृहे व ६ शौचालये, महिलांसाठी २ स्नानगृहे व ६ शौचालये, तसेच दिव्यांगांसाठी विशेष स्नानगृह व शौचालयाची सोय करण्यात आली आहे. स्वच्छता, आरोग्य व सुरक्षा यावर विशेष भर देण्यात आले असून गरम पाण्याची सोय, पिण्यासाठी शुद्ध पाणी, स्वयंपाकगृह, लॉकर्स, मनोरंजनासाठी टी.व्ही., वृत्तपत्रे, सीसीटीव्ही व अग्निशमन यंत्रणा अशी विविध सुविधा या केंद्रामध्ये आहे. या केंद्राचे व्यवस्थापन “रिअल लाईफ रिअल पिपल” या सामाजिक संस्थेकडे सोपवले आहे. ही संस्था दर आठवड्याला शहरातील रेल्वे स्थानक, बसस्थानक, उड्डाणपूल, धार्मिक स्थळे, मेट्रो स्थानके इत्यादी ठिकाणी गस्त घालून बेघर व्यक्तींचे सर्वेक्षण करते. समुपदेशनाद्वारे त्या व्यक्तींना निवारा केंद्रात आणण्याचे काम देखील ही संस्था करते.

केंद्रामध्ये राबवले जातात विविध उपक्रम
निवारा केंद्रामध्ये राहणाऱ्या व्यक्तींसाठी वेळोवेळी आरोग्य तपासणी, आधार कार्ड नोंदणी, जनधन योजनेअंतर्गत बँक खाती उघडणे, बचत गट स्थापन करणे, लसीकरण आणि कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करणे, असे विविध उपक्रम राबवले जातात. भारती विद्यापीठ, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, कर्वे इन्स्टिटयूट ऑफ सोशल सर्व्हिसेस यासारख्या संस्थांमार्फत विविध सामाजिक उपक्रम येथे घेतले जातात.

बेघर व्यक्तींच्या पुनर्वसनाला दिले जाते प्राधान्य
बेघर व्यक्तींचे पुनर्वसन करण्यासाठी देखील या केंद्राचे काम सुरू आहे. आर्थिक वर्ष २०२०-२१ पासून आतापर्यंत सुमारे ३१२ व्यक्तींचे त्यांच्या मूळ घरी किंवा नातेवाईकांकडे पुनर्वसन करण्यात आले आहे. ५० व्यक्तींना पुनर्वसन करण्यासाठी इतर संस्थेकडे पाठवण्यात आले आहे. १६५ व्यक्तींना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे.

सावली निवारा केंद्र हे केवळ गरजू व बेघरांसाठी निवासाचे ठिकाण न राहता त्यांच्या सशक्तीकरणासाठी कार्य करणारे एक प्रेरणादायी केंद्र बनले आहे. सुरक्षितता, स्वच्छता, मानवी सन्मान आणि सामाजिक समावेश या मूल्यांवर आधारित या केंद्राची कार्यपद्धती आहे. हे केंद्र राज्यातील सर्वोत्कृष्ट ठरले असून येथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला चांगल्या सोयीसुविधा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. – शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"