फक्त मुद्द्याचं!

5th September 2025
महाराष्ट्र

शासनाच्या आरोग्य कार्यक्रमांच्या रँकिंगमध्ये पिंपरी चिंचवड महापालिका अव्वल!

शासनाच्या आरोग्य कार्यक्रमांच्या रँकिंगमध्ये पिंपरी चिंचवड महापालिका अव्वल!

सलग दोन महिने उत्कृष्ट कामगिरी करत वैद्यकीय विभागाने पटकवला प्रथम क्रमांक
पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने पुन्हा एकदा राज्यभरात आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य सेवा आयुक्तालयामार्फत नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या एप्रिल व मे २०२५ च्या आरोग्य कार्यक्रमांच्या रँकिंगमध्ये पिंपरी चिंचवड महापालिका राज्यात प्रथम क्रमांकावर राहिली आहे.

viara vcc
viara vcc

एप्रिल महिन्यात ४५.१८ गुणांसह पिंपरी चिंचवड महापालिकेने पहिला क्रमांक पटकाविला तर मे महिन्यात सर्व बाबींवर अधिक प्रगती करत ४७.७० गुण मिळवून पुन्हा आपले प्रथम स्थान अबाधित ठेवले.

या रँकिंगमध्ये मातृत्व आरोग्य, बाल आरोग्य, लसीकरण, कुटुंब नियोजन, किशोरवयीन आरोग्य, पीसीपीएनडीटी, आरसीएच पोर्टल, आयडीएसपी, क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम, रेबीज नियंत्रण कार्यक्रम, कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम, डेंग्यू व मलेरिया नियंत्रण, असंसर्गजन्य आजार नियंत्रण, राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान, गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा मानांकन, ई-औषधी, मोफत निदान सेवा, आयुष्मान भारत-आरोग्य व आरोग्य कल्याण केंद्रे, एचआयव्हीएस, आशा कार्यक्रम तसेच प्रशासन व वित्तीय व्यवस्थापन अशा महत्त्वाच्या निर्देशकांचा समावेश होता. या सर्व बाबींमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत पिंपरी चिंचवड महापालिकेने राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने सलग दोन महिने राज्यातील पहिल्या क्रमांकावर राहून आरोग्य क्षेत्रातील कामगिरी सिद्ध केली आहे. ही यशस्वीता आपल्या वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर आणि सर्व नागरिकांच्या सहकार्यामुळे शक्य झाली आहे. आम्ही हीच गती कायम ठेवत पुढील काळातही जनतेस उत्तमोत्तम आरोग्य सुविधा देत राहू. – शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महानगरपालिका.

आरोग्य सेवा पोहोचवताना प्रत्येक स्तरावर काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांपासून रुग्णालयातील तज्ञ डॉक्टरांपर्यंत सर्वांचा सहभाग महत्त्वाचा ठरला आहे. ही राज्यस्तरीय कामगिरी शहरातील प्रत्येकासाठी अभिमानाची आहे. आगामी काळात आणखी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून आपण ही कामगिरी टिकवून ठेवू, असा आम्हाला विश्वास आहे. – डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, पिंपरी चिंचवड महापालिका

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"