पिंपरी चिंचवड महापालिकेला केंद्र सरकारचा ‘शहरी वाहतूक उत्कृष्टता पुरस्कार’!

हरित वाहतूक, सायकल मार्ग व पादचारी सुविधांसाठी राबवलेल्या उपक्रमांची राष्ट्रीय स्तरावर दखल
पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेने शाश्वत, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक शहरी वाहतूक व्यवस्थेसाठी राबवलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची दखल राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली आहे. या उपक्रमांसाठी महापालिकेला केंद्र सरकारच्या गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालयामार्फत “शहरी वाहतूक उत्कृष्टता पुरस्कार” प्रदान करण्यात आला आहे.

नवी दिल्ली येथे झालेल्या अर्बन मोबिलिटी परिषदेत केंद्र सरकारच्या वतीने केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्री मनोहर लाल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. याप्रसंगी हरियाणाचे मुख्यमंत्री नायबसिंह सैनी, केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार राज्यमंत्री तोखन साहू, भारत सरकारच्या गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाचे सचिव श्रीनिवास कटिकिथला, विशेष कार्यकारी अधिकारी जयदीप यांच्यासह केंद्र सरकारचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
महापालिकेच्या वतीने अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, सहशहर अभियंता बापू गायकवाड, कार्यकारी अभियंता सुनिल पवार तसेच आयटीडीपी इंडिया संस्थेचे प्रांजल कुलकर्णी आणि आशिक जैन यांनी हा सन्मान स्वीकारला. “सर्वाधिक नाविन्यपूर्ण वित्तीय यंत्रणा असलेले शहर” (City with the Most Innovative Financing Mechanism) या श्रेणीत हा पुरस्कार महापालिकेला प्राप्त झाला आहे.
शहराच्या वाहतुकीत हरित बदल घडविण्याचा उपक्रम….
पिंपरी चिंचवड महापालिकेने देशातील पहिले ग्रीन बॉण्ड जारी करून गैरमोटारीकृत वाहतूक (Non-Motorised Transport – NMT) क्षेत्रात ऐतिहासिक पाऊल टाकले आहे.महापालिकेने ग्रीन बॉण्डद्वारे २०० कोटी रुपयांचा निधी उभारण्यात आला असून, या निधीतून हरित सेतू प्रकल्प आणि टेल्को रोड पुनर्विकास प्रकल्प राबविण्यात येत आहेत. या उपक्रमाचा उद्देश म्हणजे नागरिकांना सुरक्षित व सावली असलेले पादचारी मार्ग, सुरक्षित सायकल मार्ग, सुरक्षित शाळा क्षेत्रे, सायकल पार्किंग, वृक्षलागवड, पावसाच्या पाण्याने परिसरात जमिनीतील पाणी पुनर्भरण आणि मार्गदर्शक फलकासह रस्ते फर्निचर यांसारख्या सुविधा उपलब्ध करून देणे हा आहे. हरित सेतू उपक्रमांतर्गत निगडी प्राधिकरण परिसरातील १७ किलोमीटर रस्त्यांवर विकासकामे सुरू करण्यात आली आहेत.
हरित सेतू रस्ते विकसित झाल्यानंतर केलेल्या सर्वेक्षणानुसार बहुतांश नागरिकांनी हे रस्ते मुलांसाठी आणि महिलांसाठी अधिक सुरक्षित असल्याचे सांगितले, तर अनेक लोक प्रतिनिधीनी ,नागरिकांनी अशा रस्त्यांची संकल्पना शहरभर राबवावी, असे मत व्यक्त केले . या रस्त्यांवर सुरक्षितपणे चालणे, थांबणे आणि सायकल चालवणे आता अधिक आनंददायी व सोयीचे झाले आहे.
या उपक्रमांची दखल आता राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली असून, महापालिकेला केंद्र सरकारच्या वतीने “शहरी वाहतूक उत्कृष्टता पुरस्कार” देऊन गौरवण्यात आले आहे. या पुरस्कारामुळे पिंपरी चिंचवड शहर देशभरात शाश्वत वाहतूक आणि नाविन्यपूर्ण आर्थिक नियोजनाचे आदर्श उदाहरण ठरले आहे. महापालिकेच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे चालणे, सायकल वापरणे आणि सार्वजनिक वाहतुकीचा अवलंब वाढत आहे. शहरात हरित, आरोग्यदायी आणि सर्वसमावेशक वाहतूक संस्कृती निर्माण करण्यासाठी हा सन्मान प्रेरणादायी ठरला आहे.
२०३६ पर्यंत पिंपरी चिंचवड शहरातील जवळच्या अंतरावरील प्रवास पायी, व सायकलने आणि दुर अंतरावरील सार्वजनिक वाहतुकीने करणे शक्य होईल, हे उद्दिष्ट समोर ठेवून पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या दिशेने हरित सेतू आणि टेल्को रोड प्रकल्प हे महत्त्वाचे टप्पे आहेत. आगामी काळात संपूर्ण शहर ‘१५ मिनिटांचे शहर’ या संकल्पनेनुसार विकसित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. – बापू गायकवाड, सहशहर अभियंता, पिंपरी चिंचवड महापालिका

