फक्त मुद्द्याचं!

4th February 2026
पर्यावरण

`माझी वसुंधरा`मध्ये पिंपरी महापालिका राज्यात प्रथम

`माझी वसुंधरा`मध्ये पिंपरी महापालिका राज्यात प्रथम

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : राज्य सरकारच्या वतीने राबविण्यात आलेल्या माझी वसुंधरा अभियानात पिंपरी-चिंचवड महापालिकेने राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. महापालिकेला आठ कोटींचे बक्षीस मिळणार आहे, हा निधी पर्यावरण संवर्धनासाठी वापरला जाणार आहे.

राज्यातील महापालिका, नगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दिनांक २ ऑक्टोबर २०२० पासून अभियान राबविण्यास सुरुवात झाली. पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वांवर आधारित ‘माझी वसुंधरा अभियान’ हे अभियान आहे. यावर्षी माझी वसुंधरा अभियान दिनांक १ एप्रिल, २०२३ ते ३१ मे २०२४ या कालावधीत राबविले. त्यात राज्यातील ४१४ नागरी स्थानिक संस्था व २२,२१८ ग्रामपंचायती अशा एकूण २२,६३२ स्थानिक संस्थांनी सहभाग घेतला होता.
१० लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गटात पिंपरी- चिंचवड महापालिका पहिली आली. तर नवी मुंबई महापालिकेने द्वितीय आणि ठाणे महापालिकेने तृतीय क्रमांक मिळविला आहे.

महापालिका आयुक्त शेखर सिंह म्हणाले की, पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या वतीने पर्यावरण विषयक उपक्रम राबविले जातात. माझी वसुंधरा योजनेत महापालिकेस प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले. ही आनंदाची गोष्ट आहे. त्यातून हरित शहर आणि विविध उपक्रम राबविण्यासाठी निधीची मदत होणार आहे.

वसुंधरा अभियानात एकूण २२४.५० कोटींची बक्षीसे देण्यात आली आहेत. मिळालेल्या बक्षीस रकमेचा वापर करण्याविषयी महापालिकांना सरकारने मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. त्याचा वापर निसर्गाच्या पंचतत्वांचे संरक्षण, संवर्धन व जतन करण्यासाठीच्या उपाययोजना हाती घेण्यात येणार आहेत. शहराचे हरित अच्छादन वाढविणे, अमृत वन, स्मृती वने, शहरी वने, सार्वजनिक उद्याने, जुन्या हरित क्षेत्रांचे संवर्धन आणि देखभाल, जलसंवर्धनाचे उपक्रम, रेन वॉटर हारवेस्टिंग, नदी, तळे व नाले यांचे पुनरुजीवन, सौरउर्जेवरिल एलईडी दिवे, विद्युत वाहन चार्जिंग पॉईंट उपलब्ध करून देण्यासाठी निधी वापरला जाणार आहे. माझी वसुंधरा अभियानांतर्गत घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धाच्या विजेत्यांना बक्षीस देण्यात येणार आहे.

Written By
टीम फक्त मुद्याचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"