पिंपरी-चिंचवड पालिका प्रशासनाकडून विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचा अवमान!

विकास आराखड्याच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस मोर्चा ; महापालिका प्रशासनाकडून बेदखल
पिंपरी : विकास आराखड्याच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने काढलेल्या मोर्चाला प्रचंड प्रतिसाद मिळाला असताना विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे , माजी आमदार विलास लांडे, राष्ट्रवादी शहराध्यक्ष योगेश बहल, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे , माजी स्थायी समिती अध्यक्ष प्रशांत शितोळे, शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षा कविताअल्हाट यांच्या शिष्टमंडळाला महापालिका आयुक्त भेटू शकले नाहीत. हा संविधानाचा अपमान असल्याने महापालिका प्रशासनाची चौकशी करण्याचे आदेश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले आहेत .

महापालिका विकास आराखडा हा शेतकरी ,नागरिक ,मालमत्ता धारक यांच्यावर अन्यायकारक असल्याबाबत सुमारे 50 हजार हरकती दाखल झाल्या आहेत . हा आराखडा मनमानी पद्धतीने नागरिकांवर लादण्याचा प्रयत्न महापालिका प्रशासनाने केला असल्याचे म्हणणे आहे . या आराखड्याला विरोध म्हणून पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते .पिंपरीतील शगुन चौक येथून हा मोर्चा महापालिका भवनावर धडकला. या मोर्चामध्ये विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे हे सामील झाले होते. त्यांचे पद संविधानिक असल्यामुळे महापालिका आयुक्तांनी त्यांना सामोरे जाणे गरजेचे होते, मात्र महापालिका प्रशासनाने याची दखल न घेतल्याने महापालिका द्वाराच्या पायऱ्यावर बसून त्यांना आंदोलन करावे लागले .हा राज्याचा अवमान असून आयुक्त शेखर शिंग हे राजकारण करीत आहेत याबाबत त्यांची चौकशी करण्यात यावी असा आदेश बनसोडे यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना दिला.
संविधानपद असल्याने महापालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांनी तळमजल्यावर येऊन अण्णा बनसोडे यांचे स्वागत करणे गरजेचे असताना कोणताही अधिकारी या मोर्चाला निवेदन घेण्यासाठी समोर गेला नाही. अखेर या शिष्टमंडळाने आता हे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्याचा निर्णय जाहीर केला. महापालिका प्रशासनाने जो अवमान केला आहे त्याबाबत त्याची दखल घेण्यात यावी अशी सूचना हे शिष्टमंडळ त्यांना करणार आहेत . गेल्या तीन वर्षापासून प्रशासक म्हणून आयुक्त शेखर सिंह हे जबाबदारी सांभाळत आहेत. गेल्या तीन वर्षात महापालिकेचा कारभार भ्रष्टाचारी आणि अनागोंदी झाल्याच्या अनेक तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र प्रशासनाच्या वागण्यात कोणताही फरक पडलेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस ,भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांचे सरकार सत्तेत असताना प्रशासनाने राष्ट्रवादी काँग्रेस अजित अजित पवार गटाचा मान राखणे गरजेचे होते. मात्र आयुक्त हे राजकारण करीत आहेत असा आरोप यावेळी करण्यात आला .

