फक्त मुद्द्याचं!

19th April 2025
महाराष्ट्र

राजकोट किल्ल्यावर सहा फुटाच्या पुतळ्यासाठी परवानगी

राजकोट किल्ल्यावर सहा फुटाच्या पुतळ्यासाठी परवानगी

मुंबई : मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे आमच्यासमोर ६ फुटाचे क्ले मॉडेल सादर करण्यात आले होते. आम्ही मान्यत दिली, त्यावेळी पुतळा ३५ फुटाचा असणार, त्यात स्टेनलेस स्टील वापरणार हे सांगितले नव्हते. आम्हाला माहिती दिली नव्हती. तसेच पुतळ्याच्या चबुतऱ्यासाठीही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य वास्तुविशारदाकडून परवानगी घ्यावी लागते. दोन्ही परवानगी मिळाल्यानंतर शिल्पकाराला तसे पत्र दिले जाते. त्यानंतर शिल्पकाराची जबाबदारी असते”, असा दावा कला संचलनालयाचे संचालक राजीव मिश्रा यांनी केला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा सोमवारी कोसळला. हा पुतळा कोसळल्यानंतर राज्यभरात शिवप्रेमींमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. तसेच या मुद्द्यावरुन आता राजकारण सुरु झाले असून महाविकास आघाडीने महायुती सरकारला धारेवर धरले असून या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. मात्र, राज्याच्या कला संचलनालयाचे संचालक राजीव मिश्रा यांनी या संदर्भात तांत्रिक माहिती देऊन केवळ सहा फुटांच्या पुतळ्यासाठी परवानगी दिल्याचा दावा केला आहे.

राजीव मिश्रा यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला माहिती देताना सांगितले की, आमच्याकडे जेव्हा एखादी एजन्सी पुतळा उभारण्याची परवानगी मागते, तेव्हा त्याबरोबर त्यांना पुतळ्याचे क्ले मॉडेल सादर करावे लागते. कला संचलनालयाची समिती ज्यामध्ये तज्ज्ञ, कला इतिहासकर आणि कलाकार यांचा समावेश असतो, ही समिती पुतळ्याच्या क्ले मॉडेलची तपासणी करून परवानगी देत असते. यात महापुरूषाच हावभाव, त्यांची शारीरिक रचना यावर बारकाईने लक्ष दिले जाते. यानंतर क्ले मॉडेलला परवानगी दिली जाते. क्ले मॉडेलला परवानगी मिळताच संबंधित शिल्पकार त्याला पुढे कशाप्रकारे नेतो, ही त्याची जबाबदारी असते.

यावेळी राजीव मिश्रा म्हणाले, ज्या एजन्सीकडून पुतळा उभारला गेला त्यांनी जर शिल्पकाराला पुतळ्याची उंची वाढविण्यास सांगितली असेल तर शिल्पकाराने त्यासंबंधी अभ्यास करायला हवा होता. एवढ्या उंचीचा पुतळा उभारण्यासाठी स्ट्रक्चरल इंजिनिअरची मदत घ्यावी लागेल, तसेच तिथल्या परिसरात पुतळा उभारताना कोणती काळजी घ्यायला हवी, पुतळा उभा करताना कोणती तांत्रिक काळजी घ्यावी, याचा अभ्यास न केल्यामुळे कदाचित ही दुर्घटना घडली असावी.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"