मतदानासाठी पिंपरी-चिंचवडमध्ये ४३३३ पोलिसांचा चोख बंदोबस्त!

पिंपरी : विधानसभा निवडणुकीचे मतदान शांततेत पार पडण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला आहे. सह पोलीस आयुक्त, अपर पोलीस आयुक्त, सहा पोलीस उपायुक्त, विविध पथकांच्या कंपन्यांसह ४ हजार ३३३ पोलीस सज्ज असणार आहेत. आचारसंहिता लागल्यापासून पोलिसांनी ४३८ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. तर, ४९ पिस्तुलांसह १०० काडतुसे, ९३ कोयते, तलवारी अशी हत्यारे जप्त केली आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोम्बिंग ऑपरेशन, पथसंचलन तसेच मोठ्या प्रमाणात प्रतिबंधात्मक कारवाई केल्यानंतर प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेसाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. त्यानुसार, पोलीस आयुक्त, अतिरिक्त पोलीस आयुक्त यांच्यासह ४३३३ पोलिसांचा फौजफाटा शहरात तैनात असणार आहे. हरियाणा राज्यातील पोलीस अधिकारी कर्मचार्यांचाही बंदोबस्त मागवण्यात आला आहे.
विधानसभा निवडणूक भयमुक्त, पारदर्शक व नि:पक्षपातीपणे पार पडावी, यासाठी पोलिसांनी मोठ्या प्रमाणात प्रतिबंधात्मक कारवाई केली असून सर्व हालचालींवर करडी नजर ठेवली जात आहे. पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत मावळ, पिंपरी, भोसरी, चिंचवड, भोर, खेड-आळंदी हे विधानसभा मतदारसंघाचा भाग येत आहेत. आचारसंहिता लागू झाल्यापासून आयुक्तालय हद्दीत ठिकठिकाणी लावण्यात आलेल्या नाकाबंदी दरम्यान अवैधरीत्या वाहतूक करीत असलेली एक कोटी ७६ लाख १७ हजार ५१० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली.
तसेच, अवैध पिस्तुले ४९ व १०० काडतुसे, कोयता, तलवार अशा प्रकारची ९३ शस्त्रे जप्त केली आहेत. तसेच, एक कोटी १४ लाख ३२ हजार ३८२ रुपये किमतीचा अवैध दारुसाठा यासह ४१ किलो ४६२ ग्रॅम गांजा त इतर अमली पदार्थाचा साठा जप्त करण्यात आला. आयुक्तालयाच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधात्मक कारवाई केली जात असून, विविध कायद्यांतर्गत ४३८ व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई झाली आहे. १० गुन्हेगारी टोळ्यांतील ४१ आरोपीवर मोक्का कायद्यान्वये कारवाई केली असून सात आरोपींना स्थानबद्ध केले आहे.