न्यू इंडिया को-ऑपरेटिव्हच्या ठेवीदारांना विम्याचा आसरा

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
मुंबई, प्रतिनिधी : न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेच्या घोटाळ्यातील आरोपीला सध्या पोलिस कोठडी मिळाली आहे. या प्रकरणाच्या तपासादरम्यान, ठेवीदारांसाठी दिलासादायक माहिती समोर आली आहे.
ज्या लोकांनी या बँकेत पैसे जमा केले आहेत त्यांना लवकरच विमा संरक्षणाचे पैसे मिळतील, बँकेवर निर्बंध लादल्यानंतर रिझर्व्ह बँकेने (RBI) ही माहिती दिली आहे. आरबीआयने म्हटले आहे की पाच लाख रुपयांपर्यंतची रक्कम पूर्णपणे सुरक्षित असून न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेच्या खात्यांच्या तपासणीत रिझर्व्ह बँकेला काही त्रुटी आढळल्या होत्या. यामुळे सहकारी बँकेवर अनेक निर्बंध लादले गेले, ज्यात ठेवीदारांनी पैसे काढण्याचा समावेश होता. बँकेवरील ही बंदी गेल्या गुरुवारपासून पुढील सहा महिन्यांसाठी सक्रिय असेल.
वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेच्या खात्यांच्या ऑडिटमध्ये रिझर्व्ह बँकेला काही अनियमितता आढळून आली. त्यानंतर, बँकेच्या मुख्य अनुपालन अधिकाऱ्यांनी गुरुवारी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधला. काही बँक कर्मचाऱ्यांनी निधीचा गैरवापर केल्यामुलळे आरबीआयने बँकेच्या व्यवहारांवर निर्बंध लादले आहेत. अद्याप या प्रकरणातील एकूण रक्कम किंवा त्यात सहभागी असलेल्यांची ओळख उघड केलेली नाही.
बँकेच्या ९०% हून अधिक ग्राहकांचे पैसे सुरक्षित
डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) अंतर्गत ठेवीदारांना पाच लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण उपलब्ध दिले जाणार असून बँकेच्या ९०% पेक्षा जास्त ग्राहकांचे पैसे सुरक्षित आहेत. DICGC च्या नियम 18A नुसार, ग्राहकांना पेमेंट केले जाईल. खातेधारकांनी त्यांचे सर्व दाव्याशी संबंधित कागदपत्रे ४५ दिवसांच्या आत (३० मार्च २०२५ पर्यंत) सादर करावीत. सर्व बँक खात्याशी संबंधित प्रमाणपत्रे, पर्यायी बँक खाते क्रमांक आणि तपशील दिले जावे, ज्यामुळे पैसे थेट तुमच्या खात्यात जमा होतील.