पादचाऱ्यावर कोयत्याने हल्ला ; एकास अटक

पिंपरी : खेड नाणेकरवाडी येथे पायी चालणाऱ्या व्यक्तीवर कोयत्याने पाठीमागून वार करून गंभीर जखमी केले. ही घटना बुधवार एक एप्रिल रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास आरोग्यम हॉस्पिटल, केळकर नगर, नाणेकरवाडी, ता. खेड येथे घडली.

याप्रकरणी रेवन केरबा कावळे (वय 45,रा. रामनगर, चिंचवड, मूळ गाव- बसवेश्वर गल्ली उर्फ ढोर गल्ली, लातूर) यांनी दक्षिण चाकण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. जनार्दन तुकाराम पांचाळ (वय 52, आरोग्यम हॉस्पिटल समोर, नाणेकरवाडी, ता. खेड मूळ- रा. कुरुंदवाडी, ता. बसमत जि. हिंगोली) या आरोपीस अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांच्या ओळखीचे हायटेक कंपनीचे रुपेश आदक यांनी फोनवरून प्रोब मशीनचे सेटिंग करायचे आहे, तू ये असे सांगितल्याने फिर्यादी त्यांचे हायटेक इंडस्ट्री कंपनी खराबवाडी येथे आले होते. परंतु कंपनीत लाईट बंद असल्याने कंपनीचे रुपेश आदक यांनी उद्या दुरुस्तीचे काम करू असे सांगितले. त्यांनी फिर्यादीस गाडीवरून केळकर नगर, नाणेकरवाडी येथे सोडले.
त्यानंतर फिर्यादी चालत आरोग्यम हॉस्पिटल जवळ आले असता पाठीमागून आरोपी याने फिर्यादीचे डोक्यामध्ये जोरात धारदार वस्तूने मारले. फिर्यादीच्या डोक्यामध्ये मारणारा आरोपी हा त्यांच्या ओळखीचा होता. त्याच्या हातामध्ये कोयता होता. कोयत्याने त्याने फिर्यादीच्या डोक्यात मारले व शिवी दिली. मी पारधी आहे. पारध्यासोबत वाद घालतो का, तुला जिवंत सोडत नाही असे म्हणून फिर्यादीच्या हातावर आणि बरगडीवर वार करून जखमी केले. दक्षिण चाकण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक धायगुडे हे तपास करत आहेत.

