मोठ्या मताधिक्याने जिंकणार चिंचवड विधानसभेचे मैदान

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
चिंचवड, प्रतिनिधी : दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांनी गेल्या २० वर्षांत शहरात विकासाचा पाया रचल्याने चिंचवड मतदारसंघात पुन्हा पक्षाचाच आमदार होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. भाजपाचा प्रत्येक कार्यकर्ता लक्ष्मणभाऊंच्या विकासाचा वारसा पुढे नेण्यासाठी ही निवडणूक ताकदीने लढणार आहे, त्यासाठी चिंचवडच्या मैदानावर उतरून प्रत्येकाने आजच आपली जबाबदारी सांभाळा, मैदान आपणच जिंकू, अशा शब्दात आमदार पंकजा मुंडे यांनी सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देत जोमाने काम करण्याच्या सूचना केल्या.
भाजपाच्या राष्ट्रीय सचिव आणि आमदार पंकजा मुंडे यांच्याकडे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्या अनुषंगाने आमदार मुंडे या मंगळवारी चिंचवड विधानसभा दौऱ्यावर होत्या. यावेळी भाजपा पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच माजी नगरसेवक – नगरसेविका, मोर्चा प्रमुख यांच्यासोबत आयोजित बैठकीत त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. आगामी विधानसभा निवडणुकीत चिंचवड विधानसभा मतदार संघात एक लाखांहून अधिक मताधिक्यांनी आपला उमेदवार निवडून आणण्याचा निर्धार करण्यात आला. ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने जिंकण्यासाठी सर्वांनी आजपासूनच कामाला सुरूवात करण्याचे आवाहन त्यांनी केले.
भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप म्हणाले की, गेल्या वर्षभरात संघटनात्मक कार्यातून केंद्र व राज्य शासनाच्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम सूरू आहे. विश्वकर्मा योजना, लाडकी बहिण योजना, युवा प्रशिक्षण योजनांमधून नागरिकांचा भाजपा वरील विश्वास वाढला आहे. प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय देण्याचे काम सूरू आहे. जनतेच्या या विश्वासावर चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक आणि नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत विजय पटकावला असून, आगामी विधानसभा निवडणूकीत भाजपाचा झेंडा मोठया मताधिक्याने फडकाविणार असल्याचे त्यांनी सांगितले.
भाजपा प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार अमर साबळे, भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप, आमदार आश्विनी जगताप, प्रदेश सदस्य महेश कुलकर्णी, संतोष कलाटे, मोरेश्वर शेडगे, भारतीताई विनोदे, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, माजी महापौर उषा ढोरे, सरचिटणीस नामदेव ढाके यांच्यासह माजी नगरसेवक – माजी नगरसेविका, पदाधिकारी – कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.