कानाखाली मारल्याच्या रागातून तरुणाला रस्त्यात थांबवून कोयत्याने वार!

पिंपरी, : दुचाकीवरून कामावर चाललेल्या तरुणास रस्त्यात थांबवून तुला लय माज आला आहे का, माझ्या कानाखाली मारतो का, असे म्हणत त्याच्यावर कोयत्याने वार केले. ही घटना रहाटणी येथे बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली.
निवतन मगर (वय १८, रा. थेरगाव) आणि त्याचे दोन साथीदार अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. तुषार राजू पुलावळे (वय २१, रा. एकता हौसिंग सोसायटी, थेरगाव) असे हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्यांनी काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी तुषार हे दुकानात कामावर जात असताना रहाटणी येथे आरोपींनी त्यांना थांबवले. मगर याने तुला लय माज आला आहे का, माझ्या कानाखाली मारतो का, असे म्हणत शिवीगाळ केली. त्यानंतर कोयत्याने डोक्यावर व कपाळावर वार करीत गंभीर जखमी केले. आरोपींच्या साथीदारांनी लाथाबुक्यांनी मारहाण केली. फौजदार मेटे तपास करीत आहेत.

पिस्तूल बाळगणारा तरुण जेरबंद
पिंपरी : पिस्तुल घेऊन आलेल्या एका तरुणास पोलिसांनी जेरबंद केले. गुरुवारी (दि. १०) दुपारी सव्वाएकच्या सुमारास भोसरी येथे बैलगाडा घाटाजवळ ही कारवाई केली. अविनाश महादेव जाधव (वय २८, रा. शिवसेना चौक, लांडेवाडी, भोसरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलीस हवालदार सचिन मोरे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गुरुवारी दुपारी सव्वाएकच्या सुमारास भोसरीतील बैलगाडा घाटाजवळ आरोपी जाधव याच्याजवळ २१ हजार रुपये किंमतीचे विनापरवाना देशी बनावटीचे पिस्तूल व एक जिवंत काडतुसे आढळून आले. फौजदार खाडे तपास करीत आहेत.

