राज्यभरात पुन्हा मुसळधार पाऊस

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
मुंबई, प्रतिनिधी : मुंबईत काल रात्रीपासून संततधार पाऊस सुरू झाला आहे. शहर आणि उपनगरातील सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. पहाटेपासून पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. दुपारनंतर काही काळ पावसाने विश्रांती घेतली. मात्र, कोकणासह मुंबई आणि उपनगरांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
दक्षिण मुंबईतील पाणी तुंबण्याचे मुख्य परिसर असलेल्या हिंदमाता, किंग्ज सर्कल, माटुंगा, फाईव्ह गार्डन आणि हिंदू कॉलनी परिसरात पाण्याचा निचरा न झाल्याने मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेकडून या पाण्याचा निचरा करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. महापालिकेने पंप लावून पाण्याचा उपसा केला असला तरी पाण्याचा निचरा वेगाने होण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आता रस्त्यावरील मॅनहोल उघडून पाण्याचा निचरा करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, हे काम करताना महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना जीव धोक्यात घालावा लागत आहे.
महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून जीव धोक्यात घालून पाण्याला वाट करून दिली जात आहे. मुंबईत सकाळपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. सततच्या पावसामुळे मुंबईतील अनेक सखल भागातील रस्त्यावर पाणी भरले. दादर पूर्व येथील हिंदू कॉलनी परिसरातील रस्तेही पाण्याखाली गेल्याचे दिसले. अशातच पाण्याचा निचरा करण्यासाठी पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी मॅनहोलची झाकण उघडण्यात आली. या मॅनहोलमध्ये कोणाचा अपघात होऊ नये, म्हणून पालिकेचे कर्मचारी झाकणाभोवती बसून राहिले.

कर्मचाऱ्यांचा व्हिडिओ व्हायरल
मुसळधार पावसात स्वत:चा जीव धोक्यात घालून मुंबईकरांच्या सुरक्षेकरता मॅनहोलभोवती पहारा देणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पावसाळ्यात उघड्या मॅनहोलमध्ये अनवधानाने पडून अनेक जीवघेणे अपघात होतात. त्यामुळे उघड्या मॅनहोलच्या आजुबाजूनं जाणाऱ्या मुंबईकरांना सावध करण्यासाठी बीएमसी कर्मचाऱ्याने मॅनहोलच्या झाकणावरच बसून पहारा दिला. महानगरपालिकेकडे पाण्याचा उपसा करणारे मोठ्या क्षमतेचे पंप आणि आधुनिक यंत्रसामुग्री असूनही कर्मचाऱ्यांना अशाप्रकारे जीव धोक्यात घालून काम करावे लागत आहे.
महाराष्ट्रातील पावसाचे चित्र
कोकणासाठी आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईत देखील काही भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा आहे. मुंबई, ठाण्यासाठी आज देखील ऑरेंज अलर्ट जारी झाला आहे. रायगडमध्ये आज काही भागात अतिवृष्टीचा इशारा आहे. माथेरानमध्ये मागील २४ तासांत झालेल्या अतिवृष्टीनंतर खबरदारी म्हणून रेड अलर्ट जारी झाला आहे. तसेच पुण्यातील घाट परिसरात, लोणावळा, खंडाळा येथे देखील अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. आज आणि उद्या राज्यात सर्वत्र चांगल्या पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यात आज सर्वत्र मुसळधार पावसाचा अंदाज आहे. संभाजीनगर आणि बीडसाठी ऑरेंज अलर्ट असून काही भागात अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. विदर्भात देखील सर्वत्र पावसाचा यलो अलर्ट जारी, काही भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधारेचा इशारा

