अपशब्द वापरल्याने एकावर प्राणघातक हल्ला!

पिंपरी : काळेवाडी येथे तरुणीबद्दल अपशब्द वापरल्याच्या संशयावरून एका व्यक्तीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना बुधवारी (३ सप्टेंबर) दुपारी काळेवाडी येथे घडली.

रवी किशोर रवानी (वय ४०, काळेवाडी), रोहित गायकवाड (वय ३०, शास्त्रीनगर), अल्ताफ मेहबूब शेख (वय २१, काळेवाडी) आणि एक महिला अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी रवी, रोहित आणि अल्ताफ यांना अटक केली आहे. याबाबत सचिन दिलीप नाईकनवरे (वय ३८, काळेवाडी फाटा) यांनी काळेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रवी याने फिर्यादीला “तू माझ्या मुलीबद्दल अपशब्द वापरले” असे विचारून मारहाण केली. त्यानंतर इतर आरोपींनी त्याला लाथा-बुक्क्यांनी मारले. आरोपी रवीने “आज याला संपवायचे आहे” असे म्हणताच एका महिलेने फिर्यादीच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारले. इतर आरोपींनीही लोखंडी कड्याने आणि दगडाने फिर्यादीला मारहाण करून गंभीर जखमी केले. त्यानंतर फिर्यादीला रुग्णालयात दाखल केले असतानाही आरोपींनी तिथे येऊन पुन्हा मारहाण केली. काळेवाडी पोलिस तपास करत आहेत.