कामगार मृत्यूप्रकरणाचा अहवाल देण्याचे राष्ट्रीय अनुसूची जाती आयोगाकडून आदेश!

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या मुजोरीपणाची सद्या शहरात चर्चा
पिंपरी : निगडी येथील निगडी प्राधिकरण येथील बीएसएनएलच्या चेंबरमधे गुदमरून तीन कामगारांचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा अहवाल तीन दिवसात सादर करावा, असे आदेश राष्ट्रीय अनुसूची जाती आयोगाचे संचालक कुमार नित्यानंद यांनी जिल्हा प्रशासन आणि बीएसएनएल, पोलीस, महापालिका आयुक्त यांना सोमवारी दिले आहेत. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या मुजोरीपणाची सद्या चर्चा शहरात सुरु आहे.

स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी प्राधिकरणातील भेळ चौकातिल बीएसएनएलची केबल तपासणीसाठी चेंबरमध्ये उतरलेल्या लखन उर्फ संदीप असरूबा धावरे (वय ३५, रा. बिजलीनगर, चिंचवड, मूळ गाव धाराशिव), साहेबराव संभाजी गिरशेटे (३५, रा. बिजलीनगर, चिंचवड, मूळ गाव महाराज घोडा, ता. जिवती, जि. चंद्रपूर), दत्तात्रय विजयकुमार व्हनाळे (३५, रा. स्वप्ननगरी, वाल्हेकरवाडी, चिंचवड, मूळ गाव तुळजापूर, जि. धाराशिव) यांचा मृत्यू झाला. या संदर्भातील यासंदर्भात पोलिसांनी अकस्मात मृत्यू नोंद केली आहे. तीन दिवस होऊनही पोलीसांच्या नाकर्तेपणामुळे कोणत्याही प्रकारचा गुन्हा कलमे दाखल करण्यात आलेली नाहीत.
राष्ट्रीय अनुसूची जाती आयोगाकडून दखल
सामाजिक कार्यकर्त्यांनी तसेच कामगार संघटनांनी आयोगाकडे तसेच शासनाकडे या प्रकरणाची चौकशी करावी आणि दोषींना कठोर शासन करावे, अशी मागणी केली होती. आयोगाच्या वतीने आज जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी, बीएसएनएलचे संचालक, पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांना नोटीस बजावली आहे. अहवाल सादर करण्यासाठी तीन दिवसाची मुदत दिली आहे.
काय मागविली माहिती
घटना कोठे, कधी- कशी घडली त्याची विस्तृत माहिती तसेच या संदर्भातील प्रथम तक्रारी अहवाल (एफआयआर) मध्ये काय नोंद केली. त्याचबरोबर पिडितांची नावे, पत्ते याविषयी माहिती द्यावी. या प्रकरणासंदर्भात कोणती चौकशी केली आहे. तसेच कोणती कलमे लावण्यात आली आहेत. याप्रकरणी कोणाला अटक केली आहे का? आणि आरोप पत्र आणि त्या संदर्भातील न्यायालयीन कार्यवाही काय झाली, या संदर्भातील सद्यस्थितीची माहिती द्यावी. घटना घडल्यानंतर मृत कुटुंबीयांच्या मृताच्या कुटुंबीयांना कोणत्या प्रकारची मदत केली, भरपाई दिली याविषयीची माहिती द्यावी, असे आदेश राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती आयोगाने दिले आहेत.