अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या भावाचा खून!

चऱ्होली ; मोठ्या भावाच्या पत्नीसोबत असलेल्या अनैतिक संबंधासाठी मोठा भाऊ अडथळा ठरत होता. त्यामुळे लहान भावाने आणि मोठ्या भावाच्या पत्नीने मिळून अडथळा ठरणाऱ्या भावाचा खून केला. त्यानंतर लहान भावाने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी स्वतःच पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली. मात्र पोलिसांच्या तपासात त्याचे हे गुपित फार काळ टिकू शकले नाही. पोलिसांनी लहान भाऊ आणि मयत मोठ्या भावाच्या पत्नीला अटक केली आहे. ही घटना ५ जुलै रोजी चऱ्होली येथील पठारे मळा येथे उघडकीस आली.
धनु दादा लकडे (३३, आळंदी रोड, पुणे) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी सोमनाथ दादा लकडे (१९) आणि शीतल धनु लकडे (२५) यांना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ जुलै रोजी सकाळी पठारे मळा चऱ्होली येथे प्राईल्स वर्ल्ड सिटी या सोसायटीच्या सिक्युरिटी केबिन जवळ धनु लडके याचा मृतदेह आढळला. त्याच्या डोक्यावर ठिकठिकाणी मारून त्याचा खून करण्यात आला होता. याबाबत धनु लकडे याचा लहान भाऊ सोमनाथ लकडे याने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर दिघी पोलिसांसह गुन्हे शाखेने देखील समांतर तपास सुरु केला.
गुन्हे शाखेची विविध पथके तयार करून आरोपीचा शोध सुरु करण्यात आला. तांत्रिक विश्लेषणात समोर आले कि, हा खून धनु याचा लहान भाऊ सोमनाथ यानेच केला आहे. त्यानुसार पोलिसांनी सोमनाथ याला राहत्या घरून ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने हा खून केल्याची कबुली दिली. त्यापुढे त्याने पोलिसांना दिलेल्या माहिती धक्कादायक खुलासा झाला. धनु याची पत्नी शीतल आणि सोमनाथ यांचे अनैतिक संबंध होते. या संबंधासाठी धनु हा अडथळा ठरत होता. त्यामुळे सोमनाथ आणि शीतल या दोघांनी मिळून हा गुन्हा केल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी शीतल लकडे हिला देखील अटक केली आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.