शिंदेंची गाडी बॉम्बने उडविण्याची धमकी देणाऱ्या दोघांना अटक

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
मुंबई, प्रतिनिधी : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कार बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्या ई-मेल प्रकरणी मुंबई पोलिसांनी बुलढाणा जिल्ह्यातील दोघांना अटक केली आहे.
मंगेश व्हावळ (३५) आणि अभय शिनगारे (२२) अशी दोघांची नावे आहेत. दोघेही देऊळगाव राजा जिल्ह्यातील रहिवासी आहेत. पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या गाडीमध्ये बॉम्ब ठेवल्याचा ई-मेल गोरेगाव आणि जे जे मार्ग पोलिस स्थानकांना गुरुवारी मिळाला होता. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्याबाबतची सूत्रे वेगाने काम करू लागली.
हा ई-मेल मुंबईतील आणखी वेगवेगळ्या पोलिस स्टेशनमध्ये आल्यानंतर सर्वच तपास यंत्रणा सतर्क झाल्या. मुंबई गुन्हे शाखेकडून तपास सुरु केला गेला. गेल्या काही दिवसांपासून निनावी फोन आणि धमकी देण्याचे प्रकार सुरु आहेत. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आल्याने पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. तसेच हा ई-मेल कोणी पाठवला? त्यामागे कोणाचा हात आहे, याची चौकशी सुरु आहे.